गणेशमूर्तिकारांच्या समोर आज व्यावसायिक गणेशमूर्ती विक्री करणाऱ्यांचे आव्हान

वार्ताहर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

म्‍हापशात नाटेकर, चणेकर, शिरसाट बंधूंच्या चित्रशाळेत आकर्षक मूर्ती तयार

म्हापसा: म्हापसा शहरात गेल्या तीन पिढ्यांपासून गणेशमूर्तींच्या चित्रशाळेत आपले आयुष्य खर्ची घातलेल्या गणेशमूर्तिकारांच्या समोर आज व्यावसायिक गणेशमूर्ती विक्री करणाऱ्यांचे आव्हान पुढे उभे राहिले आहे. त्यामुळे, गोव्याती मूळ पारंपरिक मूर्तिकार या व्यवसायापासून दुरावण्याची चिन्हे दिसत आहेत.

चिकणमातीच्या मूर्ती तयार करणाऱ्या गोव्यातील कित्येक चित्रशाळांमध्ये आज पेण, कोल्हापूर अशा महाराष्ट्राच्या भागांतील शेड मातीच्या मूर्ती विक्रीसाठी आणल्या जातात. तसेच, व्यवसायिक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असलेल्या गोव्यातील बहुसंख्य चित्रशाळांत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकल्या जात आहेत. त्या मूर्ती चिकणमातीच्या मूर्तींपेक्षा सुंदर दिसत असल्यामुळे तसेच त्यांचा उत्पादन खर्चही कमी असल्याने साहजिकच आजची पिढी त्या व्यावसायिकांकडे आकृष्ट होतात.

म्हापशात नाटेकर कुटुंबीयांपैकी एक कुटुंब कै. भालचंद्र नाटेकर यांची चित्रशाळा त्यांचे पुत्र कै. यशवंत व कै. जयपाल नाटेकर यांनी पुढे  नेली. त्यानंतर कै. भालचंद्र नाटेकर यांचा वारसा त्यांचे नातू जयंत नाटेकर पुढे नेत आहेत. जयंत नाटेकर हा मूर्तिकलेचा वारसा पुढे नेत असताना आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. या चित्रशाळेत आल्यानंतर गणेशभक्तांना त्यांच्या आवडीनुसार गणेशमूर्ती नेता येते. जयंत नाटेकर स्वत:ची चित्रशाळा खोर्ली येथे वर्षभर चालवतात. 

विपुल नाटेकर यांनीसुद्धा आज स्वत:च्या चित्रशाळेचे स्वरूप आधुनिकतेनुसार बदलले आहे. आजच्या युवा पिढीला पसंत पडतील अशा मूर्ती तिथे तयार केल्या जातात. गणेचतुर्थीच्या एक महिना अगोदर जयंत नाटेकर व विपुल नाटेकर आपल्या चित्रशाळा हनुमान नाट्यगृहात स्थलांतरित करतात व तिथे मूर्तीची विक्री करतात. कै. सुब्राय दिवकर यांची चित्रशाळा जुवांव मिनेझीस फार्मासीसमोर होती. त्यांचे पुत्र कै. आनंद दिवकर यांनी त्या चित्रशाळेचा वारसा पुढे नेला. आनंद यांच्या निधनानंतर ही चित्रशाळा बंद पडली. तदनंतर त्या चित्रशाळेतील मूर्ती परंपरागत विकत घेणाऱ्या लोकांनी नाटेकर यांच्या चित्रशाळेतून गणेशमूर्ती घेण्यास सुरुवात केली. 

आंगड येथे आनंद चणेकर, बाप्पा चणेकर या बंधूंनी स्वत:च्या वडिलांचा गणेशमूर्ती तयार करण्याची पारंपरिक व्यवसाय सांभाळून ठेवला आहे. आपला दुसरा व्यवसाय सांभाळत दरवर्षी गणेशचतुर्थीच्या काही महिन्यांअगोदर स्वत:च्या चित्रशाळेत चिकणमातीच्या गणेशमूर्ती तयार करण्यास ते सुरुवात करतात. तसेच, आंगड येथील अंकुश चणेकर यांच्या चित्रशाळेत गणेशमूर्ती तयार केल्या जातात.

पर्रा येथील कै. वासुदेव शिरसाट यांच्या गणपतीच्या चित्रशाळेची धुरा मागच्या तीन पिढ्यांपासून त्यांचे पुत्र कै. प्रभाकर शिरसाट यांनी सांभाळली व सध्या त्यांचे नातू वासुदेव शिरसाट ती चित्रशाळा चालवत आहेत. त्यांच्या चित्रशाळेत सध्या दरवर्षी दीडशेपेक्षा जास्त मूर्ती तयार केल्या जातात. त्यांच्या मूर्ती वर्षपद्धतीनुसार अनेक कुटुंबीयांसाठी राखीव असतात. वासुदेव शिरसाट बँकेत नोकरी करूनसुद्धा स्वत:च्या आजोबांची अखंड परंपरा मनोभावे सांभाळत आहेत.

गोव्याबाहेरून आणल्या जाणाऱ्या बहुसंख्य मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे गणपतीची चार फूट उंचीची मूर्ती दोन माणसे सहज उचलू शकतात. अशा मूर्तींसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस  कारवाई होत नाही. फक्त परिपत्रक निघते. तसेच, दुकानदारी करणाऱ्या व्यवसायिकांना राजकीय आशीर्वाद लाभत असल्यामुळे राज्य सरकारचे नियम पायदळी तुडवण्याचे धाडस त्यांच्याकडून होते, असेही गोव्यातील मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या