पालिकेची आगविरोधी यंत्रणा नसल्यासारखीच

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

पणजी महापालिकेच्या मालकीच्या मार्केटमधील अत्यावश्‍यक सेवेसाठी उभारण्यात आलेली आगविरोधी यंत्रणा असून नसल्यासारखी आहे. सन २०१८ मध्ये लागलेल्या आगीनंतरही ही यंत्रणा अद्याप कार्यान्वित करण्यासाठी कोणतीही हालचाल महापालिकेकडून झालेली नाही

पणजी : पणजी महापालिकेच्या मालकीच्या मार्केटमधील अत्यावश्‍यक सेवेसाठी उभारण्यात आलेली आगविरोधी यंत्रणा असून नसल्यासारखी आहे. सन २०१८ मध्ये लागलेल्या आगीनंतरही ही यंत्रणा अद्याप कार्यान्वित करण्यासाठी कोणतीही हालचाल महापालिकेकडून झालेली नाही. त्यामुळे महापालिका सर्वस्वी अग्निशमन दलावर अवलंबून आहे, असेच सध्या चित्र आहे. 

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने मार्केट इमारत उभारल्यानंतर त्याची काहीप्रमाणात मालकी महापालिकेकडे मागील दोन वर्षांपूर्वी आली आहे. अद्याप या इमारतीची पूर्णपणे मालकी येण्यासाठी आरोग्य खात्याकडे त्याविषयीची फाईल पडून आहे. परंतु या इमारतीचा विचार केला तर सुमारे पाचशेच्या वर दुकानगाळे या इमारतीत आहेत. लाखो रुपयांची उलाढाल या मार्केट इमारतीत होते. महापालिकेला केवळ सोपो करातून महसूल मिळतो. अद्याप येथील दुकानदारांचे भाडेकरार झालेले नसल्याने लाखो रुपयांच्या महसुलापासून महापालिका वंचित आहे. या इमारतीच्या सुरक्षिततेसाठी अत्यावशक सेवा म्हणून आग लागल्यास पाण्याचा तत्काळ वापर करता येईल अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. इमारतीच्या चारही कोपऱ्यांत व प्रवेशद्वारांजवळ पाण्याच्या वाहिन्या भिंतीला अडकवून ठेवल्या आहेत, त्या कित्येक वर्षांपासून तशाच आहेत. याशिवाय चारही दिशांना ठिकठिकाणी उभारलेले हाटड्रंट शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. 

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या इमारतीत दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असते. आठ दरवाजे असल्याने आणि मार्केट सायंकाळी ८ वाजता बंद होत असल्याने ते सुरक्षीत मानले जात होते. परंतु २१ एप्रिल २०१८ मध्ये साडेनऊच्या सुमारास जी आग लागली त्यात अनेक दुकानांतील साहित्य जळून खाक झाले होते. त्याशिवाय काही दुकानदारांचे साहित्यही या आगीमुळे खराब झाले होते. त्यावेळी अग्निशामक दलालाच आग विझवावी लागली होती. या घटनेवेळी येथील आग विझविण्यासाठी असलेल्या अत्यावश्‍यक सेवेविषयी प्रश्‍न उपस्थित झाले होते. आग विझविण्यासाठी जी यंत्रणा याठिकाणी ठेवली आहे, ती सर्व असून नसल्यासारखीच आहे. 

बाजार समितीच्या बैठकीत विषय
महापालिकेच्या बाजार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत मार्केटमधील या अत्यावश्‍यक सेवेचा विषय उपस्थित करण्यात आला. या सेवेचे कंत्राट कोणत्या कंपनीला दिले आहे, ती कंपनी किती महिन्यातून त्या सेवेची तपासणी करते, ही सर्व माहिती बाजार समितीचे अध्यक्ष शेखर डेगवेकर यांनी संबंधित कक्षअधिकाऱ्याकडे मागितली आहे. डेगवेकर यांनी सांगितले की, हा महत्त्वाचा विषय असून, आपण संबंधितांकडे आज विचारणा केली आहे. आयुक्तांसमोर हा विषय गेला असून, कोणत्या कंत्राटदाराकडे ही सेवा सांभाळण्याचे काम दिले आहे, ते पाहून पुढील कार्यवाही केली जाईल.

संबंधित बातम्या