म्हापसा पालिकेचे बाजारपेठ निरीक्षक भ्रष्टाचारात गुंतलेले: सुदेश हसोटीकर

म्हापसा पालिकेचे बाजारपेठ निरीक्षक भ्रष्टाचारात गुंतलेले: सुदेश हसोटीकर
Corporation fails to meet legal requirements

म्हापसा : म्हापशात पालिकेच्या वतीने विक्रेत्यांचे विभाग स्थापन होईपर्यंत त्यांना बाजारपेठेतून उठवताच येणार नाही. म्हापसा पालिकेचे बाजारपेठ निरीक्षक भ्रष्टाचारात गुंतलेले असून, त्यांच्यावर मुख्याधिकाऱ्यांचा वचक नाही, असा दावा ‘फेरी विक्रेता सेने’चे गोवा राज्य अध्यक्ष सुदेश हसोटीकर यांनी केला आहे.


दरम्यान, म्हापशातील विक्रेत्यांबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. फेरी विक्रेता सेनेतर्फे आज बुधवारी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली असता या विषयासंदर्भात विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश इन्पेक्टर्सना देण्यात आल्याचे त्यांनी संघटनेला आश्वासन दिले. तथापि, पालिकेच्या बाजारपेठ निरिक्षकांवर आपला विश्वासच नाही, असा दावा श्री. हसोटीकर यांनी केला आहे. आम्ही सुमारे शंभरेक विक्रेते वर्ष १९९५ पासून म्हापसा बाजारपेठेत व्यवसाय करीत असून, आमच्यावर अन्याय होत आहे, असेही ते म्हणाले. काही नवीन विक्रेते हे लोकप्रतिनिधींचे मतदार असल्यानेच त्यांचे हितरक्षण करण्यासाठी आम्हावर अन्याय होत असल्याचेही श्री. हसोटीकर यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.


यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे, की म्हापसा बाजारपेठेत विक्रेत्यांवर पालिकेकडून अन्याय होत असून, या देशातील कायदेकानुनाला अनुसरून तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या अनुरोधाने यासंदर्भात विक्रेत्यांच्या समस्यांसंदर्भात योग्य चौकशी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा.


‘फेरी विक्रेता सेने’चे गोवा राज्य अध्यक्ष सुदेश हसोटीकर यासंदर्भात म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार विक्रेत्यांच्या मूलभूत हक्कांचे हितरक्षण पालिकेने करणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेच्या १९(६) या कलमानुसार, इंग्लंडच्या धर्तीवर नियमावनली प्रसृत करून अथवा त्यासंदर्भात अधिनियम संमत करून हा विषय सोडवता येणे राज्य सरकारला शक्य होते; तथापि, त्यासंदर्भात न्यायालयाने वेळोवळी सूचना करूनही राज्य सरकारने काहीच केलेले नाही. बाजारपेठेत विशिष्ट जागा निवडून तिथे व्यापार-उदीम करण्याचा अधिकार नागरिकांना नसल्याने एखाद्या भागात कोणत्या ठिकाणी असा व्यवसाय करता येईल यासंदर्भात जागा निर्देशित करणे हे शासकीय अधिकारिणींचे कर्तव्य आहे. तथापि, त्याबाबत म्हापसा पालिका असमर्थ ठरली आहे.


फिरते विक्रेते व अन्य विक्रेते यांच्यासाठी पालिकेने निवारा शेड उभारण्याची मागणी या संघटनेतर्फे या पूर्वी केली होती. तथापि, त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे नमूद करून यासंदर्भातील नेमके कारण काय, यासंदर्भात संघटनेने याच निवेदनवजा तक्रारीत पालिका प्रशासकांना विचारणा केली आहे. कायद्यानुसार प्रत्येक विक्रेता व फिरत्या विक्रेत्याला बाजारपेठेत विक्री व्यवसाय करण्याचा अधिकार आहे; तथापि, अशा विक्रेत्यांवर अन्याय केला जात आहे. तसेच, म्हापसा पालिकेचे बाजारपेठ निरीक्षक बुरसट तथा गैर शब्दांचा वापर करून विक्रेत्यांची मानहानी करीत आहेत. बाजारपेठ निरीक्षकांची ही गैरवर्तवणूक पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना माहीत नाही, असेही श्री. हसोटीकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

कायदेशीर बाबींच्या पूर्तीबाबत पालिका अपयशी!
वर्ष १९९५ पासून म्हापसा पालिकेला सात्यत्याने निवेदने देऊनही विक्रेते व फिरते विक्रेते यासंदर्भातील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात म्हापसा पालिकेला पूर्णत: अपयश आलेले आहे. प्रत्येक वेंडिंग झोनमध्ये कमाल किती संख्येने अशा विक्रेत्यांची व्यवस्था करावी, यासंदर्भातील निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारक्षेत्रात असतो व त्या शहरातील टावन वेंडिग कमिटीच्या माध्यमातून या कामाला चालना देणे आवश्यक असते. तथापि, अशी समिती म्हापशात स्थापन झाली असली तरी कार्यपूर्तीबाबत ती समिती तसेच पालिकाही असमर्थ ठरली आहे. कायद्यानुसार विक्रेत्यांना प्रमाणपत्रे देणे आवश्यक असतानाही म्हापसा पालिकेने त्याबाबत कामचुकारपणा केला आहे, असे विक्रेत्यांचे तसेच ‘फेरी विक्रेता सेने’चे म्हणणे आहे.

नागरिकांच्या तसेच विक्रेत्यांच्या मूलभूत हक्कांचे हितरक्षण करण्यात राज्य सरकार व म्हापसा पालिकाही गेल्या कित्येक वर्षांपासून अपयशी ठरली आहे. विक्रेते व फिरते विक्रेते यांना शासकीय यंत्रणेने अधिमान्यता देणे हे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ‘विक्रेता (उदरनिर्वाह संरक्षण आणि विक्री नियम) अधिनियम २०१४’ हा कायदा संमत करण्यात आला आहे.
- सुदेश हसोटीकर, अध्यक्ष, फेरी विक्रेता सेना, गोवा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com