मार्केट इमारतीच्या थकित वीज बिलाची रक्कम भरण्याचे महापौरांचे आश्वासन

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 डिसेंबर 2020

एक वेळ समझोता (वन टाईम सेटलमेंट) या योजनेंतर्गत महापालिका २ कोटी २७ लाख रुपये भरणार आहे. येत्या दोन दिवसांत ही रक्कम वीज खात्यात भरली जाईल, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली. ​

पणजी- महापालिकेचे मार्केट इमारतीच्या वीज बिलाची रक्कम व्याजासह आठ कोटींच्यावर गेली आहे. परंतु सरकारच्या एक वेळ समझोता (वन टाईम सेटलमेंट) या योजनेंतर्गत महापालिका २ कोटी २७ लाख रुपये भरणार आहे. येत्या दोन दिवसांत ही रक्कम वीज खात्यात भरली जाईल, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली. 

मार्केट इमारतीच्या वीज बिलाचा कळीचा मुद्दा बनला होता. आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी यापूर्वी आयुक्त म्हणून असताना जी एक कोटी रुपयांची हमी दिली होती, त्यामुळे मार्केटमधील विजेची जोडणी विद्युत खात्याने तोडली नाही. आता मार्केटमधील विजेचे बिल वाढत वाढत ते व्याजासह आठ कोटी १० लाखांच्या आसपास पोहोचले आहे. 

तेवढी एक रकमी रक्कम भरणे महापालिकेला शक्य नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महापालिकेचे भाडेकरार तत्काळ करून घ्या, आम्ही वीज बिल माफ करतो असे आश्‍वासन दिले होते, याविषयी मडकईकर म्हणाले की, त्यांनी आश्‍वासन दिले आहे. भाडेकरारालाही सुरुवात झाली आहे, पण वीज बिलाची रक्कम व्याजासह सुमारे ८ कोटी १० लाखांवर गेली आहे. 

त्यातून वन टाईम सेटलमेंट या योजनेखाली महापालिकेला २ कोटी २७ लाख रुपये भरावे लागत आहेत. त्यामुळे कमीतकमी महापालिकेचे पावणे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. आयुक्त रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी 
सांगितले. 

महापालिकेने एकदम एवढ्या रकमेचा भरणा केला तर आम्ही सरकारला कोणत्याही कामासाठी आर्थिक मदत मागू शकतो, असे सांगून मडकईकर म्हणाले की वीज बिलाची रक्कम भरल्यानंतर आम्ही तात्पुरता मीटर आमच्या महापालिकेच्या घेणार आहे. त्यानंतर कायमस्वरुपी मीटर घेतला जाईल, ज्या दुकानदारांचे मीटर आहेत त्यांची तपासणी केलीजाईल. 

कारण एका दुकानदाराच्या मीटरवर इतर व्यापारीही कनेक्शन घेतल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची तपासणी करणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.

संबंधित बातम्या