गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात ; अनेक राजकारण्‍यांची प्रतिष्‍ठा पणाला

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 डिसेंबर 2020

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २०० उमेदवारांचे भवितव्य आज होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २०० उमेदवारांचे भवितव्य आज होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे. कोविड काळात झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून उत्साह दिसला नसला तरी भाजप व काँग्रेसने दक्षिण व उत्तर गोव्यात बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. मतांची टक्केवारी घटल्याने मतदारराजाने कल कोणाच्या बाजूने दिला आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या निकालानंतर पुढील वर्षीच्या पालिका व २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राजकीय पक्षाचे लक्ष लागून आहे. 

 

वर सुरू होणार आहे. उत्तरेत तिसवाडी, बार्देश - १ व दक्षिणेतील सालसेत - १ केंद्रावर प्रत्येकी पाच मतदारसंघांची तर बार्देश - २, पेडणे, डिचोली, फोंडा - १ या केंद्रांवर प्रत्येकी चार मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे तेथे संध्याकाळी उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू राहण्याची शक्यता आहे. इतर केंद्रावर प्रत्येकी प्रत्येकी ३ व २ मतदारसंघांची मतमोजणी होणार असल्याने ती दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारपर्यंत जिल्हा पंचायतीमध्ये कोणाकडे बहुमत झुकले आहे याचा अंदाज येऊ शकतो. 

सकाळी ७ वाजल्‍यापासून प्रक्रिया सुरू

प्रत्येक मतमोजणी केंद्रावर सकाळी ७ वाजता मतपत्रिका पेट्या असलेला स्ट्राँग रूम संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडला जाणार आहे. यावेळी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे सक्तीचे आहे. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी १५ पेक्षा अधिक टेबल्स मांडण्यात आली आहेत. सुरवातीला पोस्टल मतपत्रिकांची व त्यानंतर मतपेट्या उघडून मतपत्रिकांची मतमोजणी सुरू केली जाणार आहे. एका मतदारसंघातील मतमोजणी ही प्रभागांची असलेल्या संख्येनुसार दोन किंवा तीन फेऱ्यात पूर्ण होईल. त्यामुळे किमान सरासरी दोन तास प्रत्येक मतदारसंघातील मतांची मतमोजणीसाठी लागण्याची शक्यता लागणार आहे. 

 

प्रतिष्ठा पणाला

राज्यात जिल्हा पंचायतीसाठी ५६.८२ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा मतदान घटले असले, तरी भाजप व काँग्रेसने बहुमत मिळण्यावर दावा केला आहे. भाजपने ४१ जागा लढविल्या आहेत, तर काही अपक्षांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने ३७ जागा लढवल्‍या आहेत.  मगो, आप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दोन्ही जिल्ह्यातील लढविलेल्या जागा बहुमतापेक्षा कमी आहेत. त्यामुळेच काँग्रेस वा भाजपलाच बहुमतासाठी संधी आहे. ७८ उमेदवारांनी अपक्ष म्हणून लढत दिली आहे त्यामुळे त्यांना पडलेली मते इतर काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या मतांवर परिणाम करू शकतात. काँग्रेस व मगोमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदार व मंत्र्यांचीही कसोटी लागणार आहे. त्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश मतदारांना मान्य होता की नाही हे त्यांच्या मतदारसंघात उभे केलेल्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवरून सिद्ध होणार आहे. 

केंद्रांवर कडक बंदोबस्त 

प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्यावेळी केंद्राबाहेर मोठी गर्दी अपेक्षित आहे त्यामुळे केंद्रापासून काही अंतरावर पोलिसांनी बॅरिकेडस् घातली आहेत. मतदारसंघाच्या मतमोजणीनुसार उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची वर्णी त्या त्या भागात लावण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी
दिली. 

 

काँग्रेसच मारणार बाजी : प्रदेशाध्यक्ष  

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप सरकारने मतदारांना परावृत्त करण्यासाठी बरेच डावपेच आखले. परंतु, त्याला न जुमानता मतदारांनी मतदान केले आहे. यावेळी काँग्रेसने कोणाशीही युती न करता निवडणूक लढविली आहे. मतदानाची टक्केवारी घटल्याने त्याचा फायदा काँग्रेसलाच होणार आहे. सरकारच्या जनहितविरोधी प्रकल्पामुळे मतदारांनी या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील. दोन्ही जिल्ह्यात काँग्रेसचेच अध्यक्ष व उपाध्यक्ष असतील, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले. 

 

भाजपलाच मिळणार बहुमत : मुख्यमंत्री सावंत

जिल्हा पंचायतीच्या उत्तर व दक्षिणेत भाजपलाच निर्विवाद बहुमत मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी ज्या पद्धतीने पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आमदार, मंत्री व नेत्यांनी काम केले आहे, ते पाहता विजय आमचाच आहे. या बहुमताने भाजप सरकारवरील लोकांचा असलेला विश्‍वास सिद्ध होणार आहे. १५ व्या वित्तीय आयोगाने ७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातील प्रत्येकी ७.५ कोटी रुपये दोन्ही जिल्ह्यांना ग्रामीण भागातील विकासकामांसाठी देण्यात येतील. जिल्हा पंचायत सदस्यांना ग्रामीण भागात विकास करण्यास संधी आहे. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेवर हे सरकार सदस्यांना काम करण्यास मदत करणार आहे, असे ते म्हणाले. 

 

८ - १० उमेदवार निवडून येतील : मगो

 
जिल्हा पंचायत निवडणुकीत मगोचे १७ पैकी किमान ८ ते १० उमेदवार निवडून येतील. ही लढत भाजप व मगो यांच्या अटीतटीची झाली आहे हे स्पष्ट आहे. या निवडणुकीच्या प्रचारावेळी तळागाळात जाण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस व भाजप हे एकत्रित आले असले तरी मगोच्या उमेदवारांनी त्यांना चांगली लढत दिली आहे. जेथे मगोचे उमेदवार आहेत तेथे काँग्रेसचे अस्तित्वच नाही असा दावा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केला.

 

अधिक वाचा :

गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीसाठी केवळ ३१ कोरोना रुग्णांकडून मतदान

गोव्यातील प्रकल्पांच्या कामांना लागलाय ‘ब्रेक’

प्रमोद सावंत यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

 

संबंधित बातम्या