ागुजरातचे जोडपे गोव्‍याला हनिमूनला आले अन.....

तेजश्री कुंभार
बुधवार, 6 मे 2020

सध्‍या आम्‍ही आमच्‍या गुजरात येथून एका खासगी गाडीला पैसे देऊन आम्‍हाला आणण्‍यासाठी बोलावले आहे. आम्‍ही गुजरातला गेल्‍यावर स्‍वत: १४ दिवस विलगीकृत करून घेणार आहोत.

पणजी,

 कोणाच्‍या आयुष्‍यात कधी काय होईल, हे काही सांगता येत नाही. लग्‍नानंतर हनिमूनला जाणे हे प्रत्‍येकाचे स्‍वप्‍न असते. मात्र, टाळेबंदीमुळे मूळचे गुजरात येथील रहिवासी असणारे मेरजा जोडपे गोव्‍यात गेल्‍या एक महिन्‍यापासून अडकले आहे. एक महिना गोव्‍यात घालविल्‍यानंतर लवकरात लवकर राज्‍यात परतण्‍याची प्रतीक्षा हे जोडपे करीत आहे. 
उमेश मेरजा म्‍हणाले, आम्‍ही ४ मार्च रोजी गोव्‍यात पोहोचलो आणि तेव्‍हापासून येथे अडकलो आहोत. नवीन नवरी सोबत असल्‍याने आणि माझी बायको पहिल्‍यांदा गोव्‍याला आल्‍याने घरातील लोक काळजीत आहेत. टाळेबंदीत आम्‍ही गोव्‍यात अडकले जाणार याची माहिती आम्‍हाला नव्‍हती. 
सध्‍या आम्‍ही आमच्‍या गुजरात येथून एका खासगी गाडीला पैसे देऊन आम्‍हाला आणण्‍यासाठी बोलावले आहे. आम्‍ही गुजरातला गेल्‍यावर स्‍वत: १४ दिवस विलगीकृत करून घेणार आहोत. मात्र ती गाडी अजून गोव्‍याच्‍या हद्दीपर्यंत पोहोचलेली नाही. ती गोव्‍यात पोहोचल्‍यावर पुढे काय होणार याबद्दल सध्‍या आम्‍हाला काहीच माहिती नाही, असेही श्री. उमेश म्‍हणाले. 

असा मिळाला आश्रय...
टाळेबंदीच्‍या पार्श्वभूमीवर राज्‍या - राज्‍यांच्‍या हद्दी बंद झाल्‍यानंतर काय करावे, ते आम्‍हाला सूचत नव्‍हते. आम्‍ही गुजरात सरकारच्‍या कोरोना मदत केंद्राशी संपर्क साधला. त्‍यानंतर त्‍यांनी केंद्र मदत केंद्राशी संपर्क साधून गुजरातमधील व्‍यक्‍ती गोव्‍यात अडकल्‍याचे कळविले. त्‍यानंतर  आम्‍हाला यूथ हॉस्‍टेलची माहिती दिली. येथे अतिशय चांगले वातावरण आणि अन्नही मिळत असल्‍याने आमची गैरसोय टळल्‍याचे श्री. उमेश यांनी सांगितले.

संबंधित बातम्या