Covid 19 Delta Strain: सिंधुदुर्गातून येणाऱ्यांची काटेकोरपणे होणार तपासणी

Covid 19 Delta Strain: सिंधुदुर्गातून येणाऱ्यांची काटेकोरपणे होणार तपासणी
Delta strain goa

पणजी: डेल्टा प्लस(delta-plus) हा कोविडच्या विषाणूचा(covid 19) नवा प्रकार गोव्यात पोहोचू नये यासाठी सीमेवर विशेषत: सिंधुदुर्गातून येणाऱ्यांची अधिक काटेकोरपणे तपासणी करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. या तपासणीस पुरक म्हणून खासगी प्रयोगशाळांना सीमेवर चाचणी केंद्र उघडण्यासाठी सरकार परवानगी देणार आहे. यासाठी दोन-तीन प्रयोगशाळांशी सरकारची बोलणी सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे दिली.(The Goa government has decided to scrutinize those coming from Sindhudurg)

ते म्हणाले, डेल्टा विषाणूची काही प्रकरणे गोव्यात आढळली होती. 26 रुग्णांना या विषाणूची लागण झाली होती. डेल्टा प्लस या विषाणूची लागण कुठल्याही रुग्णाला झाल्याची माहिती सरकारकडे नाही. सरकार नियमितपणे 15 दिवसांनी काही नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवते. त्यातून असा नवा विषाणू आढळला तर त्याची माहिती समोर येते.

गोव्यातील प्रसिद्ध डॉ. ऑस्कर रिबेलो म्हणाले की, डेल्टा हा धोकादायक स्ट्रेन आहे. पण तो बरा होऊ शकतो. माझ्या माहितीनुसार, गोव्यात डेल्टा स्ट्रेन आढळून आलेला आहे. परंतु ‘डेल्टा प्लस’ हा आढळलेला नाही. डेल्टा हासुद्धा अत्यंत धोकादायक स्ट्रेन असून, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या आरोग्याला अधिक धोका असतो. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

राज्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य खाते, समुद्र विज्ञान संस्था, गोवा विद्यपीठ व आयसीआरए (जुने गोवे) अशा पाच मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा आहेत. मात्र आरोग्य खात्याच्या लॅबमध्ये डेल्टा स्ट्रेनची तपासणी केली गेली. डेल्टा प्लसची तपासणी ही एसआरएल डायग्नोस्टिक लॅबमध्ये करण्यात आली, अशीही माहिती आहे. याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी यावर बोलणे टाळले.

जे काय घडते, आढळते, त्याची माहिती लोकांना दिल्यास सर्वांच्या दृष्टीनेच योग्य होईल, असे सांगत त्यांनी काही संकेत दिले आहेत. डेल्टा व डेल्टा प्लस हे धोकादायक स्ट्रेन्स गोव्यात आढळूनही आरोग्य खात्याने त्याची वाच्यता केली नाही. यावरून आरोग्य खात्यात बऱ्याच गोष्टी दाबून ठेवल्या जात असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, गोव्यातून पुण्यात 126 नमुने पाठवले होते त्यापैकी काही नमुने हे वेगवेगळ्या स्ट्रेनचे असल्याचे आढळून आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com