राज्यात चोवीस तासांत ‘कोरोना’चे सर्वाधिक दहा बळी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे दहा बळी गेले आहेत. त्यामुळे राज्याने बळींचा दोनशेचा (आजपर्यंत २०४) आकडा पार केला आहे. त्याशिवाय आज २ हजार १९९ चाचण्यांपैकी ६३६ जण पॉझिटिव्ह आढळले असून, ही आत्तापर्यंची सर्वाधिक संख्या ठरली आहे.

पणजी: राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे दहा बळी गेले आहेत. त्यामुळे राज्याने बळींचा दोनशेचा (आजपर्यंत २०४) आकडा पार केला आहे. त्याशिवाय आज २ हजार १९९ चाचण्यांपैकी ६३६ जण पॉझिटिव्ह आढळले असून, ही आत्तापर्यंची सर्वाधिक संख्या ठरली आहे. दिवसेंदिवस ही वाढणारी संख्या राज्यासमोर चिंतेचा विषय ठरला आहे. राज्यातील कोविड इस्पितळे ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत. डॉक्टर्स व परिचारिकांची कमतरता पडत आहे. प्लाझ्मादानसाठी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीही पुढे येण्यास कचरत असल्याने सरकारवर जनजागृती करण्याची पाळी आली आहे. 

आरोग्य संचालनालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीतून कोरोनाबाधित व मृत्यू झालेल्यांची माहिती स्पष्ट झाली आहे. दिवसभर आज घेण्यात आलेल्या २ हजार १९९ कोविड चाचण्यांपैकी १ हजार २२८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर आत्तापर्यंत राज्यात दिवसभरात सर्वाधिक पॉझिटिव्ह आढळणारी (६३६) संख्याही नोंदली गेली आहे. याव्यतिरिक्त अजून ३३५ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. राज्यात एका दिवसात ९ जणांचा मृत्यू होण्याची नोंद झालेली होती. मात्र, आज ही संख्या १० वर पोहोचल्याने राज्य प्रशासनानेही धसका घेतला आहे. अनेक गंभीर आजाराने पीडित असलेले व कोरोनाग्रस्त रुग्ण गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत आहे. मात्र, त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्‍यक असलेल्या प्लाझ्मा मिळवण्यासाठी आरोग्य खात्याकडून धडपड सुरू आहे. त्यामध्ये म्हणावे तसे यश अजूनही आलेले नाही. 

कोविड निगा केंद्रेही फुल्ल
राज्यातील कोविड निगा केंद्रेही ‘फुल्ल’ होत आली आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त असलेले व लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना गृह अलगीकरणाचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. सध्या राज्यात ३७६ कोरोनाग्रस्त रुग्ण गृह अलगीकरणात आहे. आज २०९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त इस्पितळातील विलगीकरण वॉर्डमध्ये १३७ जणांवर उपचार सुरू आहे तर विविध रेसिडन्सी व हॉटेल्समध्ये २७ लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. राज्याने कालच कोविड चाचण्यांचा २ लाखांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत गोव्यात १८ हजार ६४२ रुग्ण कोरोनाग्रस्त झाल्याची नोंद झाली आहे, तर त्यातील ४३७९ रुग्ण हे सक्रिय आहेत. १४ हजार ५९ जण या आजारातून बरे झाले आहेत. दरदिवशी सुमारे २ हजार लोकांची कोविड चाचणी केली जाते व दिवसभरात सरासरी सुमारे दीड हजार चाचण्यांच्या नमुन्यांचा अहवाल देण्यात येतो. त्यामुळे अधिकाधिक चाचणी अहवाल चोवीस तासात उपलब्ध करण्यात येत आहेत. 

२४ तासांतील मृत्‍यू
गेल्या चोवीस तासांत कांदोळी येतील ४७ वर्षीय पुरुषाचा शिवोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे अढळून आले. फातोर्डा येथील ७० वर्षीय पुरुष आणि बायणा येथील ७६ वर्षीय महिलेचा गोमेकॉत मृत्यू झाला. इतर मृत्यू झालेल्यांमध्ये वास्को येथील ३६ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ५५ वर्षीय पुरुष, सां जुझे दी आरियल येथील ३० वर्षीय युवक, डिचोली येथील ६५ वर्षीय पुरुष, नेरूल येथील ५३ वर्षीय महिला आणि साखळी येथील ६४ वर्षीय पुरुष, तसेच न्यू वाडे- वास्को येथील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

राजधानीत रुग्‍ण वाढले
पणजी शहरात कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. मागील दोन दिवसात ५४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. आजही शहरातील तसेच शहर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे क्षेत्रातील चाचण्या घेतलेल्यांपैकी ३८ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. त्यामध्ये राजभवनातील आणखी एक कर्मचारी बाधीत असल्याचे दिसून आल्यामुळे राजभवनातील आत्तापर्यंत ३ कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचे आरोग्य केंद्राच्या अहवालावरून दिसून येते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या