कोविड-१९ गोवा: प्लाझ्मा दान करा, लोकांचे जीवन वाचवा

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

विश्वजित राणे यांचे वाळपईतील आरोग्य केंद्रात आयोजित रक्तदान शिबिरात आवाहन

वाळपई:  जगात कोविड १९ चा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अमेरिकासारख्या देशात कोविडमुळे बिकट स्थिती निर्माण झालेली आहे. तिथे मास्क मिळणे कठीण बनले आहे, पण गोव्यात आरोग्य खाते नेहमीच जनसेवेसाठी कटिबध्द राहिले आहे. आपल्या राज्यातही दररोज रुग्ण वाढत आहेत. ही गंभीर बाब बनलेली आहे. या कोविडच्या बिकट प्रसंगात आरोग्य खात्याचे डॉक्टर, परिचारिका दिवसरात्र सतत रुग्णांच्या सेवेत तत्पर राहिले आहेत. रक्ताची, ऑक्सिजनची या काळात फार आवश्यकता असते. त्यासाठी लोकांनी रक्तदान केले पाहिजे. प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री वि‍श्‍वजित राणे यांनी वाळपई येथील आरोग्य केंद्रात वाळपई भाजपतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात केले.

एकदा प्लाझ्मा दान केल्यावर पंधरा दिवसांनी पुन्हा प्लाझ्मा दान करता येतो. या प्लाझ्मा दानातून लोकांचे जीवन वाचविण्यास सहकार्य मिळणार आहे. म्हणून प्लाझमा दान करण्यासाठी लोकांनी योगदान द्यावे. असेही ते पुढे म्हणाले. यावेळी आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. श्याम काणकोणकर, नगरसेवक शहजीन शेख, सय्यद सरफराज, विनोद शिंदे, प्रसाद खाडिलकर, अंजली च्यारी, वाळपई भाजप मंडळ अध्यक्ष रामनाथ डांगी, विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य आदींची उपस्थिती होती. 

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे पुढे म्हणाले की, राज्यात रक्ताची फार गरज आहे. त्यासाठी असे उपक्रम राबविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर वाळपईत घेतले आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात कामाचा भार वाढला आहे. पुढील काही महिनेही कोरोनाचा प्रभाव कायम राहणार आहे. अनेकांचा पोटापाण्याचा व्यवसाय ठप्प बनला आहे. त्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. एखादा गाव कंटेंन्मेट झोन करणे सोपे असते, पण नंतर सांभाळणे कठीण असते. 

रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान करून सामाजिक काम केले. उदय सावंत यांनी सूत्रनिवेदन केले. प्रसाद खाडिलकर यांनी विश्वजित राणे यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. 

यावेळी कोविड योद्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिबिरात सुमारे ४१ जणांनी रक्तदान केले.

संबंधित बातम्या