कोविड-१९ गोवा: राज्यात गेल्या चोवीस तासात ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

पेडणेतील १२ वर्षीय मुलगा, २५ वर्षीय महिलेचा समावेश

पणजी: राज्यात गेल्या चोवीस तासात आणखी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात आतापर्यंत झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४२ इतकी झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आज पेडणे येथील अवघ्या १२ वर्षाच्या मुलाचा आणि पर्वरी येथील २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य खात्याने दिली. यासाठी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. 

गेल्या चोवीस तासात ६४३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ४४६ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्यासाठीची टक्केवारी (रिकव्हरी रेट) राज्यात ७७.६५ टक्के इतका आहे. आज ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांच्यामध्ये ६ जणांचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणि बाकीच्या दोघांचा मृत्यू ईएसआय इस्पितळात झाला असल्याची माहिती मिळाली. मृत्यू झालेल्या व्यक्तींत आगशी, तिसवाडी येथील ६० वर्षीय महिला, कुठ्ठाळी येथील ६१ वर्षीय महिला, पर्वरी येथील २५ वर्षीय महिला, बेतोडा, पणजी येथील ७० वर्षीय पुरुष, करासवाडा, म्हापसा येथील ६८ वर्षीय पुरुष, पेडणे येथील १२ वर्षीय मुलगा, वेर्णा येथील ७८ वर्षीय पुरुष आणि मोयरा, बार्देश येथील ६७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

आजपर्यंत २१ हजार सातशे साठ रुग्ण बरे झाले आहेत. आजच्या दिवशी ५६३ लोकांना घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले तर २३० कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना इस्पितळात भरती करण्यात आले आहेत. सध्या ५९२० इतके सक्रिय कोरोनाचे रुग्ण असल्याची माहितीही मिळाली.

आमदार टोनी फर्नांडिस मणिपाल रुग्णालयातून आज घरी परतले.  एका बारा वर्षाच्या मुलाचा कोविडने मृत्यू झाला, हे अत्यंत धक्कादायक आहे. सरकारकडून कोविड हाताळणी व व्यवस्थापनात आज एक नवा निच्चांक गाठला असून हा दुर्दैवी प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या