COVID-19 Goa: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांवर; पाहा आठवडाभराची कोरोना संसर्गाची आकडेवारी

COVID-19 Goa
COVID-19 Goa

पणजी: गोवा राज्यातील(Goa) कोरोना संसर्गाचे(Covid-19) प्रमाण तसेच मृत्यूची संख्या गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आली असल्याने लोकांमध्ये असलेली भीती दूर होऊ लागली आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाणही (पॉझिटीव्हीटी) 32 टक्क्यांवर आले आहे व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांवर पोहचले आहे. गेल्या चोवीस तासांत 30 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, तर 1625 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. मृत झालेल्या रुग्णांपैकी तिघांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता.(COVID-19 Goa The patient recovery rate is 85 percent) 

आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, 30 मृत कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू इस्पितळात दाखल करण्यात आल्यापासून चोवीस तासांत झाला आहे. त्यातील एकाला कुडतरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोमेकॉ इस्पितळात स्थलांतर करण्यात आले होते. तेव्हा त्याचा अगोदरच मृत्यू झाला होता. आज गोमेकॉ इस्पितळापेक्षा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील मृत झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गोमेकॉ इस्पितळात 9, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 11, खासगी इस्पितळांमध्ये 8, तर इएसआय इस्पितळ व कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

राज्यस्तरीय संचारबंदी राज्यात लागू करण्यात आल्यापासून गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाणात आटोक्यात येऊन सध्या ते दोन हजारपेक्षा नोंद होत आहे. कोरोना चाचण्यांसाठी लोकांच्या रांगा लागत असून त्याचा अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी खासगी लेबोरेटरीची मदत घेण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांत नेहमी सरासरी चार हजारापेक्षा अधिक चाचण्या होत आहेत व बाधितांची संख्याही दोन हजाराच्या आत नोंद होत आहे. कोरोना संसर्ग पॉझिटिव्हीचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाले होते ते आता 32 टक्क्यांवर आले आहे. तसेच कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा खाली गेले होते ते आता 85 टक्क्यांवर पोहचले आहे. यावरून राज्यात कोरोना संसर्गाच्या स्थितीवर बरेच नियंत्रण आल्याचे उघड होत आहे. 

राज्यातील नगर व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. एकेकाळी पणजी, चिंबल, फोंडा व मडगाव या क्षेत्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन हजारापेक्षा अधिक होती, ती आता दोन हजाराच्या आत आली आहे. पणजीत 1133, चिंबलमध्ये 1064, मडगावात 1829, तर फोंड्यात 1032 रुग्ण सक्रिय आहेत. कोरोनाबाधित रुग्ण गृह अलगीकरण स्वीकारत असल्याने तसेच सरकारने खासगी इस्पितळातही ‘डीडीएसएसवाय’ योजनेअंतर्गत खाटा उपलब्ध केल्याने सध्या सरकारी इस्पितळावरील ताण कमी झाला आहे. 

गोमेकॉ इस्पितळात चिंताजनक असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत होते, तर इतर इस्पितळांमध्ये गंभीर नसलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जात होते. इस्पितळात प्राणवायूचा रात्रीच्यावेळी तुटवडा होऊ लागल्याने काही रुग्णांना प्राणवायू वेळेत सुरळीत होऊ न शकल्याने जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी गोवा खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकांनंतर ही स्थिती आटोक्यात आली. गोवा खंडपीठाने या एकूण प्रकरणाचा पंचनामा करताना सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच फैलावर घेऊन त्याची खोलवर चौकशी करण्यास सुरवात केल्यावर अधिकाऱ्यांनी इस्पितळात ठाण मांडून ही स्थिती जाणून घेतली व त्यामध्ये सुधारणा केली. गोवा खंडपीठाकडून दरदिवशी आढावा घेतला जात नसल्याने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनीही यामध्ये लक्ष घालून बिकट होत असलेल्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यास यश मिळवले होते.

‘कोविशिल्ड’चे 9 बॉक्स गोव्यात 
गोव्याला आणखी नऊ बॉक्सेसचा कोविशिल्ड लसीकरणाचा साठा आज पोहचला आहे. हा साठा संध्याकाळी मुंबईमार्गे विमानाने आला आहे. तो ताब्यात घेऊन सरकारकडे सुपूर्द केल्याची माहिती गोव्यातील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गोव्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. 

गेल्या 24  तासांतील स्थिती 

  • सक्रिय कोरोना रुग्ण...19,328
  • नवे कोरोना रुग्ण........1625
  • कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ...30
  • बरे झालेले रुग्ण..........3075
  • इस्पितळात दाखल......207
  • गृह अलगीकरणात......1438
  • एकूण चाचण्या............5063
 तारीख  चाचण्या  बाधित  बरे झालेले प्रमाण  संसर्ग प्रमाण 
15 मे 5571  1957  75.60 % 35.12 %
16 मे 3877 1314 77.66 %  33.89 %
17 मे 4265 1562 79.69 %  36.62 %
18 मे 3898 1358 81.16 %  34.83 %
19 मे 3873 1209 82 % 31.21 %
29 मे 4581 1582 83.70 % 34.53 %

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com