कोरोनामुक्त पोलिसांची प्लाझ्मादानाकडे पाठ; ३५७ जणांना कोरोना संसर्ग

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

कोरोनाग्रस्त झालेल्या पोलिसांमध्ये एक उपमहानिरीक्षकासह २ अधीक्षक, २ उपअधीक्षक तसेच चार निरीक्षकांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांनी प्लाझ्मादानकडे पाठ केली आहे. 

पणजी: राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून कोरोना योद्धे असलेल्या ३५७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी आतापर्यंत २५३ जण कोरोनामुक्त झाले असून १०४ जणांवर उपचार सुरू आहेत. आयआरबी पोलिसमध्ये स्वयंपाकी असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त झालेल्या पोलिसांमध्ये एक उपमहानिरीक्षकासह २ अधीक्षक, २ उपअधीक्षक तसेच चार निरीक्षकांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांनी प्लाझ्मादानकडे पाठ केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ज्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली, मात्र लक्षणे दिसत नव्हती त्यांनी अधिक तर घरात अलगीकरण करून घेतले. तर ज्यांना त्रास जाणवत त्यातील काहीजण ईएसआय कोविड इस्पितळात दाखल झाले, तर काहीजण कोविड निगा केंद्रामध्ये १४ दिवस राहणे पसंत केले. मात्र ८० टक्के पोलिसांनी घरातच राहून कोरोनामुक्त झाले. ऑगस्ट अखेरपर्यंत दक्षिण गोवा पोलिस क्षेत्रातील १३६ पोलिसांना, उत्तर गोवा पोलिस क्षेत्रातील ११३ पोलिसांना, वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रातील २२ जणांना, आयआरबी बटालियनच्या ६८ पोलिसांना, ३५ गृहरक्षकांना कोरोनाची लागण झाली. या सर्वांना ही लागण ड्युटीवर काम करत असताना तसेच काहीजण कंटेन्‍मेंट झोनमध्ये राहत असल्याने झाल्याचे पोलिस सूत्राने सांगितले. 

अवघे १५ टक्के पोलिस कामावर रुजू
पोलिस खात्यातील २५३ पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले, तरी आतापर्यंत १५ टक्के पोलिसच कामावर रूजू झाले आहेत. ज्यांनी १४ दिवस अलगीकरण पूर्ण केले त्यांनी आणखी काही दिवस आराम करण्यासाठी सुट्टी घेतली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पोलिस स्थानकातील कामकाजावर पडला आहे. सध्या असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने कामकाज सुरू आहे. काही महत्त्वाची प्रकरणे वगळल्यास तसेच नव्या तक्रारी वगळल्यास जुन्या प्रकरणांचा तपास सध्या ठप्प झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांनी प्लाझ्मा दानासाठी अजूनही धास्तावलेले आहेत. हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत पोलिसांनी प्लाझ्मादान केले आहे. त्यामुळे या पोलिसांना काल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार प्लाझ्मादान करून गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना जीवनदान देण्याची जबाबदारी राहणार आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या