गावठी मिठाची विक्री थंडावली; व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

तिसवाडी तालुक्यातील मिठागरात स्थानिक व्यावसायिकांनी यंदाही मिठाचे पीक काढले असून ते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. या गावठी मिठाला गोव्यात मोठी मागणी असली तरी कोविडमुळे या व्यवसायावर परिणाम झाल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांनी या प्रतिनिधीला सांगितली.

गोवा वेल्हा: तिसवाडी तालुक्यातील मिठागरात स्थानिक व्यावसायिकांनी यंदाही मिठाचे पीक काढले असून ते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. या गावठी मिठाला गोव्यात मोठी मागणी असली तरी कोविडमुळे या व्यवसायावर परिणाम झाल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांनी या प्रतिनिधीला सांगितली. सांत आंद्रे भागात पूर्वी अनेक मिठागरे होती. आज त्यांची संख्या कमी भासत आहे. तरीही काही व्यावसायिकांनी हा व्यवसाय टिकवून ठेवला आहे.

काहींचे ते उपजीविकेचे एकमेव साधन बनून राहिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार, स्थानिक मिठागरात तयार होणाऱ्या या मिठाला गोव्यात आणि शेजारील राज्यात मोठी मागणी आहे. कोविडचे सावट अजूनही दूर झाले नसल्याने यंदा व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीही त्यांना फटका बसला होता. तरीही व्यवसायीयिकांनी आपापल्या मिठागरात उत्पादन काढले होते.

कोविडच्या सावटाखाली स्वतःच्या मिठागरात या गावठी मिठाचे पीक काढताना त्यांना अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागले आहे. आता हा व्यवसाय अत्यंत जोखमीचा झाला असून कामगार मिळणे कठीण बनले आहे. त्यांची मोठ्या मजुरीची मागणी आवाक्याबाहेरची वाटते. त्यांची राहण्याची सोय करावी लागते. शिवाय त्यांच्या अनेक मागण्या असतात. या मागण्या नाईलाजाने पूर्ण कराव्या लागतात.

गोव्यात 45 वर्षांवरील ‘कोविड’ प्रतिबंधक लसीकरण सुरू

अन्यथा हा व्यवसाय बंद केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा कठीण अवस्थेत काहींनी मिठागरात मिठाचे पीक काढले आहे, पण मिठाच्या विक्रीला जोर नाही. पारंपरिक गावठी मिठावर अवलंबून असणारे लोक अनेक कारणांसाठी या मिठाचा वापर करतात. आज प्रसिद्ध कंपनीचे मीठ राज्यात उपलब्ध आहे.

गोव्याच्या मिठागरातील मीठाची मागणी अजूनही कमी झालेली नाही. दरवर्षी या मागणीचे प्रमाण वाढतच आहे. राज्यातील खेड्यापाड्यात, प्रमुख शहरांतही या मागणीला जोर आहे. शिवाय शेजारील राज्यातही मागणी आहे. यात कर्नाटक, महाराष्ट्र आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्या कोविडमुळे मिठाच्या विक्रीने जोर पकडलेला नाही. एप्रिलपासून हे मीठ गोव्यात ठिकठिकाणी वितरीत होणार आहे. 

संबंधित बातम्या