गरज भासल्यास पेडण्यातील कोविड उपचार केंद्र सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

एकंदर परिस्थितीवर नजर ठेवून आहोत व तातडीच्या परिस्थितीसाठी पेडणे येथील कोविड केंद्र  तयार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर पेडणे नागरिक समितीने उद्या (ता. १४) आयोजित केलेले लाक्षणिक उपोषण तूर्त स्थगित ठेवले आहे.

पेडणे- तालुक्यात सध्या कोविड संसर्गजन्य रुग्ण संख्या कमी झाली आहे, तसेच तालुक्यातील बहुतांश रुग्ण विलगीकरण स्वीकारत आहेत. इतर कोविड उपचार केंदात जागा उपलब्ध आहे. एकंदर परिस्थितीवर नजर ठेवून आहोत व तातडीच्या परिस्थितीसाठी पेडणे येथील कोविड केंद्र  तयार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर पेडणे नागरिक समितीने उद्या (ता. १४) आयोजित केलेले लाक्षणिक उपोषण तूर्त स्थगित ठेवले आहे.

उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व आरोग्य संचालनालय संचालक यांना एक निवेदन सादर करून १३ ऑक्टोबरपर्यंत कोविड केंद्र  सुरू करावे अशी मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर आज आंदोलनकर्त्यांची चर्चा उपजिल्हाधिकाऱ्यांबरोबर झाली या चर्चेच्या वेळी उपजिल्हाधिकारी श्री. निपाणीकर यांनी वरील माहिती दिली.

श्री. निपाणीकर यांनी पुढे सांगितले, की पेडणे तालुक्यातील बहुतांश रुग्ण हे घरात विलगीकरण स्वीकारतात. कोविड उपचार केंद्रासाठी सर्व तयारी पूर्ण आहे, परंतु सध्या पेडणे तालुक्यात रुग्णांची संख्या कमी दिसून दिसत आहे. तसेच इतर सेंटरमध्ये जागा उपलब्ध आहेत या कारणास्तव हे कोविड सेंटर सुरू केले गेले नाही.

आंदोलनकर्त्यांनी यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, की रुग्णांमध्ये वाढ होऊनसुद्धा जर सेंटर सुरू झाले नाही असे दिसून आल्यास समिती गप्प राहणार नाही व उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल. या बैठकीस अध्यक्ष राजमोहन शेटये, ॲड. व्यंकटेश नाईक, ॲड.  जितेंद्र गावकर, ॲड. सिताराम परब, ॲड. प्रसाद शहापूरकर, सुर्यकांत चोडणकर, भारत बागकर, श्री. प्रभू, निवृत्ती शिरोडकर व इतर सदस्य उपस्थित होते.

संबंधित बातम्या