‘राण्यांचे जुवे’तील देखाव्यांस अर्धविराम

प्रतिनिधी
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

यंदा चतुर्थीनिमित्तची बेटावरील चलचित्रे पाहणे दुरापास्त, देखावे न करण्याचा निर्णय

म्हापसा: बार्देश तालुक्यातील नादोडा पंचायत क्षेत्रातील ‘राण्यांचे जुवे’ बेटावरील गणेशचतुर्थी उत्सवानिमित्तच्या चित्रपरंपरेस यंदा कोविडमुळे अर्धविराम मिळाला आहे. देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी होऊ नये यासाठी तेथील रहिवाशांनी व्यापक जनहितास्तव देखावे न करण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

जुवेवासीयांनी घेतलेल्या त्या निर्णयामुळे सुमारे शतकभरापूर्वीपासून अव्याहतपणे चालत आलेला देखाव्यांचा पारंपरिक वारसा खंडित झालेला आहे. गेल्या सुमारे शंभर वर्षांत तो वारसा नाइलाजाने प्रथमत: यंदा स्थगित करावा लागल्याचे त्यासंदर्भात माहिती देताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.

सर्व बाजूंनी शापोरा नदीने तसेच त्या नदीच्या खाडीने वेढलेल्या त्या बेटावर सध्या सुमारे चोवीस-पंचवीस घरे असून, त्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के घरांत असे देखावे दरवर्षी केले जायचे. तेथील प्रमुख घर मानले जाणारे राणे घराण्याचा छोटेखानी राजवाडा अजूनही अस्तित्वात आहे. त्या राजवाड्यात त्या प्रभागातील सर्वांत मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. तो त्या भागाचा पारंपरिक रीतिरिवाज असून, आणि त्याबाबत तेथील अन्य कुणीही कुरघोडी करीत नाही, हे त्या भूभागाचे वैशिष्ट्य आहे.

त्या प्रभागात कित्येकदा नदीला पूर येत असल्याने त्या परिसरात पाणी साचून राहते. त्यामुळे, तेथील कित्येक घरे दुमजली बनवलेली असून, पुरापासून संरक्षण मिळावे यासाठी गणपतीचे पूजन आणि चतुर्थीनिमित्तचे देखावेही पहिल्या मजल्यावर तयार केले जात असतात. परंतु, राणे घराण्यातील श्रीगणेशाचे पूजन मात्र तळमजल्यावरच होत असते. गतवर्षी सुमारे वीस वर्षांनंतर त्या भागात मोठा पूर आला होता.

पूर्वीच्या काळात रस्तावाहतुकीची साधने फारशी नव्हती. जास्तीत जास्त बैलगाडीचा वापर करावा लागत होता. अशा परिस्थितीत सुलभतेच्या दृष्टीने जुवेवासीय प्रामुख्याने मोरजी गावातून गणेशमूर्ती व देखाव्यांची चित्रे आणण्यासाठी होडीचा वापर करायचे. त्यासाठी पोर्तुगीज राजवटीच्या काळात जुवेवासीय मंडळी रात्रीच्या वेळी होडीतून मोरजीला जाऊन पुन्हा यायची. दोन होड्यांची सांगड बांधून त्यावर गणेशमूर्ती तसेस देखाव्यांची चित्रे ठेवून गटागटाने त्यासंदर्भातील वाहतूक केली जायची, अशी यासंदर्भात माहिती देताना स्थानिक नागरिक विश्वनाथ हळदणकर यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून त्या बेटावरील काही नागरिक स्वत:हूनही असे देखावे तयार करीत असतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

चित्रदेखावे प्रामुख्याने पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक विषयांवर आधारलेले असतात. हल्लीच्या काळात काही विद्यमान सामाजिक ज्वलंत विषयांवरही देखावे केले जात आहेत. त्यासाठी काही शिक्षित तरुण हल्ली आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाचा आणि विद्युत यंत्रसामग्रीचाही यथोचित तथा पूरक वापर करीत असतात.

जुवे येथील बहुतांश घरांत गणेशोत्सव किमान सात दिवस असतो. काही जण नऊ किंवा अकरा दिवसही गणेशोत्सव साजरा करतात. परंतु, त्या बेटावरील सर्वच्या सर्व घरांतील चित्रदेखाव्यांचा आस्वाद एकाच वेळी घेता यावा यासाठी उत्तर गोव्यातील लोक उत्सुकतेपोटी जास्त करून गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत तिथे आवर्जून दरवर्षी मोठ्या संख्येने भेटी देत असतात.

देखाव्यांच्या निमित्ताने प्रत्येक घरात विद्युत अथवा नैसर्गिक स्वरूपाची रोषणाई तसेच सजावट केलेली असते. त्याबाबत, एक-दोन घरे जरूर अपवाद असतात. त्याचे कारण म्हणजे वर्षभरात त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झालेले असते. एक मात्र खरे, की संपूर्ण प्रभागच असे चित्ररथ देखावे करण्यात दरवर्षी रममाण झालेला असतो. मात्र, कलारसिक प्रेक्षकांना त्या पर्वणीपासून आनंद लुटणे कोविड महामारीमुळे अशक्यप्राय झालेले आहे.

संबंधित बातम्या