डिचोलीत ‘कोविड संसर्गाची धास्ती

Dainik Gomantak
मंगळवार, 16 जून 2020

कडक पावले उचलण्याची गरज, सर्वसामान्य जनतेची मागणी

डिचोली

राज्यातील विविध भागाबरोबरच डिचोली तालुक्‍याला जोडलेल्या काही भागात ‘कोविड’ महामारीचा संसर्ग फैलावल्याने आता डिचोलीतही हळूहळू धास्ती पसरू लागली आहे. डिचोलीत या संसर्गाचा फैलाव होता कामा नये, यासाठी पालिकेसह संबंधित घटक सतर्क झाले असले, तरी डिचोली तालुक्‍याला जोडून असलेल्या संसर्गजन्य भागातील काहीजणांचा नोकरी-धंद्यानिमित्त डिचोलीत संपर्क येत आहे. त्यामुळे डिचोलीत पसरलेली धास्ती वाढत आहे. या प्रकारावर नियंत्रण येणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पालिका आणि प्रशासकीय यंत्रणेने कडक उपाययोजना करावी, असे मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्‍त होत आहे.
‘कोविड’ महामारीचा संसर्ग झालेल्या आणि डिचोलीत संपर्क येणाऱ्या डिचोलीबाहेरील काही कामगारांना प्रतिबंध करण्यात आल्याचे समजते. राज्यातील विविध भागात ‘कोविड’ महामारीचा संसर्ग फैलावत असला, तरी डिचोली शहर अद्याप तरी सुरक्षित आहे. ही डिचोलीवासियांसाठी अजूनतरी दिलासादायक बाब आहे. मात्र, डिचोली तालुक्‍यातील कुडचिरे आदी काही गावांना जोडलेल्या सत्तरी तालुक्‍यातील काही गावात ‘कोविड’च्या संशयित रुग्णांत भर पडत आहे. त्यातच कुडचिरे तसेच महाराष्ट्रातील सिमेलगतच्या काही भागातील काहीजणांचा नोकरी-धंदा किंवा अन्य कामानिमित्त डिचोली शहराशी संपर्क येत असल्याचे समजते. त्यामुळे संसर्ग फैलावण्याचा धोका नाकारता येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
संसर्गजन्य गावांना जोडून असलेल्या संशयित भागातील काही कामगारांना सध्या तरी कामावर येण्यास शहरातील काही आस्थापनांनी प्रतिबंध केल्याची माहिती मिळाली आहे.

साप्ताहिक बाजारावर नियंत्रण..!
‘कोविड’चा संसर्ग टाळण्यासाठी डिचोली पालिकेने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. मागील बुधवारी डिचोलीतील साप्ताहिक बाजारावर तर बऱ्याच मर्यादा आल्या होत्या. बाजारात काही पारंपरिक स्थानिक विक्रेते बसले होते. खास साप्ताहीक बाजारात बसणाऱ्या फळ-भाजी, प्लास्टिक, रेडीमेड कपडे आदी विक्रेत्यांना बसण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. बाजारात व्यवसाय थाटलेल्या काही विक्रेत्यांना पालिकेने हटविले होते. त्यामुळे मागील आठवड्यात डिचोलीत नेहमीप्रमाणे मागील साप्ताहीक बाजार भरला नव्हता. बाजारातील गर्दीवरही बरेच नियंत्रण आले होते. आता पुढील म्हणजेच येत्या बुधवारी (ता. १७) साप्ताहिक बाजारावर निर्बंध घालण्याचा विचार पालिकेने चालविला असल्याचे समजते. पुढील साप्ताहिक बाजार भरणार नसल्याचे नगरसेवक अजित बिर्जे यांनी संकेत दिले आहेत.

संबंधित बातम्या