गृह अलगीकरण रुग्‍णांना ‘कोविड किट’: आरोग्‍यमंत्री राणे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

विश्‍वजित राणे म्हणाले की, घरगुती अलगीकरण करून उपचार घेणाऱ्यांना अशाप्रकारचे किट देण्याचा उपक्रम सुरू करणारे गोवा हे पहिले राज्य असेल. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

पणजी: घरगुती अलगीकरण करून कोरोनाचे उपचार घेणाऱ्या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना ‘कोविड किट’ प्रदान केले जाईल. त्यात उपयुक्त औषधे, सॅनिटायझर, मास्क, तसेच  थर्मामीटर, ऑक्सिमीटर इत्यादींचा समावेश असेल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. उदय काकोडकर व इतर डॉक्टरांची उपस्थिती होती. मंत्री राणे म्हणाले की, घरगुती अलगीकरण करून उपचार घेणाऱ्यांना अशाप्रकारचे किट देण्याचा उपक्रम सुरू करणारे गोवा हे पहिले राज्य असेल. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. येत्या आठवड्यात या किटचे वितरण सुरू होईल. कुटुंबात अनेक कोरोनाचे अनेक रुग्ण असले तरीही प्रत्येक कुटुंबासाठी एकच किट देण्यात येईल. 

रुग्‍णांवर सर्वाधिक खर्च करणारे गोवा एकमेव
कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी एका व्यक्तीवर सर्वाधिक खर्च करणारे गोवा हे एकमेव राज्य आहे, असे सांगून राणे म्हणाले की, राज्यात प्लाझ्मा थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे आम्ही कोरोना रुग्णांना प्लाझ्मा देण्याचे काम सुरू राहील. प्लाझ्मा ट्रान्समिशनसाठी आणखी मशीन खरेदी करण्याची राज्याची योजना आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या डॉ. डिसा यांना आज डिस्चार्ज दिल्याचे राणे यांनी नमूद केले.

डॉक्टरांचे पथक आज पाहणी करणार
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून सुरू करण्याच्या तारखेचा निर्णय उद्या, शनिवारी डॉक्टरांचे पथक रुग्णालयाच्या तपासणीनंतर निश्चित करेल. या रुग्णालयात २५० खाटांचा वापर केला जाईल. या रुग्णालयाची ५६० खाटांची क्षमता असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, या ठिकाणी डीएचएसचे दहा वैद्यकीय अधिकारी असतील. दंत महाविद्यालयाच्या परिचारिकाही सेवेत सामाविष्ट केल्या जातील. तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आऊटसोर्स एजन्सीमार्फत  नेमणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बांदेकर यांना निर्णय घेण्याची मोकळीक
गोमेकॉतील नेत्रचिकित्सा वॉर्डचे काही दिवसांत कोविड वॉर्डमध्ये रुपांतर होईल. कोविड रुग्णालयांमधील बहुतेक बेडवर रुग्ण आहेत आणि खासगी रुग्णालयेही रुग्‍णांनी पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे गोमेकॉत बेडच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांना मजल्यावरील झोपावे लागल्याची कबुली राणे दिली. त्यामुळे आणिबाणीची परिस्थिती उद्‍भवल्यास रुग्णांची स्थिती पाहून डॉ. बांदेकर यांना निर्णय घेण्यास मोकळीक दिली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या