म्हापशात ‘कोविड’ चाचणी धिम्या गतीने

Dainik Gomantak
मंगळवार, 2 जून 2020

उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात स्वॅब तपासणीसाठी अजूनही रांगाच

म्हापसा

म्हापसा शहरातील ‘कोविड-१९’ संदर्भातील चाचणी धिम्या गतीने होत असून, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात स्वॅब तपासणीसाठी अजूनही लोकांच्या रांगा दिसून येतात. यासंदर्भात शासकीय पातळीवर यथायोग्य नियोजन केले असते, तर दरदिवशी तासनतास अशा रांगा दिसल्याच नसत्या, असे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
या चाचणीसंदर्भात विस्तृत माहिती मिळवण्यासाठी या इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहनदास पेडणेकर यांच्याशी सोमवारी सायंकाळी संपर्क साधला असता, त्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही व त्यासंदर्भात या इस्पितळाच्या ‘लॅब’शी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. त्यानंतर लॅबशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असतात तिथे पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. तसेच, तिथे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तेथील छायाचित्रे घेण्यासही मज्जाव केला. या चाचणीसंदर्भात दोन दिवसांनंतर अहवाल येत असतो. तोपर्यंत त्या लोकांना स्वत:च्या घरी जाऊ देण्यात येते व त्यानंतर अहवाल पॉजिटिव्ह असल्यास संबंधितांचे अलगीकरण करण्यात येते.
म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळान थ्रोट स्वॅब चाचणी केंद्र कार्यरत केले असल्याने त्या ठिकाणी दररोज अजूनही लोकांची मोठी गर्दी उसळते. अशी तपासणी करण्यासाठी गोमंतकीय तर येतच असतात. त्याचबरोबरच, अन्य राज्यांतील व्यक्‍तीही बहुसंख्येने येत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला या भागांतील तसेच काही प्रमाणात कर्नाटकवासीयांचाही त्यात सहभाग असतो.
चाचणी घेण्यास विलंब लागत असल्याने तिथे रुग्णांच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हापसा पोलिस तिथे कार्यरत आहेत. सध्या या रुग्णालयाच्या आवारात प्रतिदिन साधारणत: २५० ते ३०० व्यक्‍ती चाचणीसाठी येत असतात; तथापि, अशा स्वरूपाची चाचणी करण्यासाठी डॉक्‍टरांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढवली नसल्याने लोकांच्या रांगा दीर्घ काळ असल्याचे आढळून येते. एका रग्णासाठी साधारणत: दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागत असतो.
अशा व्यक्‍तींना प्रामुख्याने पत्रादेवी येथून म्हापसा येथे चाचणीसाठी आणले जाते. त्यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते व पोलिसांच्या बरोबरीने त्यांना म्हापसा येथे चाचणीसाठी आणले जाते. सध्या महाराष्ट्रातून चाकरमानी गोव्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात येत असल्याने इस्पितळात गर्दी होत आहे. शासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने ही परिस्थिती असते.

संबंधित बातम्या