कोलवाळ क्रीडा प्रकल्पात आता कोविड चाचणी सुरु

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

लोकांची आरोग्‍य केंद्रात गर्दी होत असल्यामुळे आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणारे गावातील नियमित रुग्ण नाराजी व्यक्त करीत असत. त्यामुळेच आता हे स्थलांतर करण्यात आले आहे.

कोलवाळ: येथील आरोग्य केंद्रातील कोरोना तपासणी विभाग लोकांच्‍या गर्दीमुळे चार दिवसांपूर्वी कोलवाळ क्रीडा प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आला असून, त्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोलवाळ आरोग्य केंद्रात नियमितपणे येणारे ओपीडी रुग्ण व कोविडविषयक चाचणी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी होत असल्यामुळे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांना नेमके कोणत्या रांगेत उभे राहावे याची कल्पना नसल्यामुळे त्यांचे खूपच हाल होत असत. उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्ततपासणी, डोळ्यांची व दातांची तपासणी अशा अनेक कारणांसाठी नियमितपणे येणारे रुग्ण कोविडविषयक चाचणीसाठी आलेल्‍या लोकांच्‍या रांगेत उभे राहायचे.

कोविडबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्‍यांना आरोग्‍य केंद्रातर्फे सूचना देऊन आरोग्य खात्याच्‍या वाहनातून कोविड उपचार केंद्रात नेण्यात येत असते. आरोग्य केंद्रात येणार्‍या नियमित रुग्णांची व कोविडविषयक चाचणी करण्यासाठी येणाऱ्या 

लोकांची आरोग्‍य केंद्रात गर्दी होत असल्यामुळे आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणारे गावातील नियमित रुग्ण नाराजी व्यक्त करीत असत. त्यामुळेच आता हे स्थलांतर करण्यात आले आहे.

कोलवाळ क्रीडा प्रकल्पाच्या इमारतीत कोरोनाबाधितांची तपासणी करण्यासाठी आरोग्य खात्याकडून परवानगी घेण्‍यात आली आहे. आरोग्य केंद्रापासून दूर असलेला कोविड संदर्भातील स्वतंत्र चाचणी विभाग आता लोकांनाही सोयीचा झाला आहे. एखादी व्यक्ती कोविडबाधित असूनही कोविडबाधित असल्‍याची लक्षणे दिसत नसल्यामुळे बिनधास्तपणे फिरत असते. त्यामुळे त्या त्‍या रोगाची बाधा अन्य लोकांना व घरातील लोकांनाही होऊ शकते, याची दखल घेऊन हे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कोलवाळ आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. दामोदर नार्वेनकर यांनी सांगितले की कोलवाळ आरोग्य केंद्राची जागा अपुरी पडत असल्यामुळे केंद्राच्‍या मुख्य दरवाजाजवळ पत्र्यांची शेड उभारून रुग्णांना तपासणीसाठी तात्पुरती सोय करण्यात आली होती. कोविडविषयक तपासणीसाठी रोज लोक येत असल्यामुळे तसेच दिवसेंदिवस वाढती संख्या पाहून आरोग्य खात्यातर्फे 

कोलवाळ क्रीडा प्रकल्पात कोविडविषयक वेगळ्या ठिकाणी तपासणी विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात होणारी गर्दी आटोक्यात आली आहे.

गोव्याच्या सीमारेषा सध्या वाहतुकीसाटी खुल्या केल्याने अन्य राज्यांतून येणाऱ्या लोकांच्या संदर्भात आरोग्य खात्यातर्फे मार्गदर्शक तत्त्‍वे घालून दिली जात आहेत. त्‍यांची अंमलबजावणी केल्यास कोविड नियंत्रणात येणार असल्याचे डॉ. नार्वेनकर यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या