'डीडीएसएसवाय' अंतर्गत होणाऱ्या कोविड उपचारांना तूर्त स्थगिती

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

या योजनेतून सरकारमान्य खासगी इस्पितळात विनाशुल्क उपचार घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती व त्यासाठीची पॅकेजही या अधिसूचनेत निश्‍चित करण्यात आली होती. ही पॅकेज या सरकारमान्य खासगी इस्पितळांनी मान्य केली नाही. 

पणजी-  दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेंतर्गत (डीडीएसएसवाय) सरकारमान्य खासगी इस्पितळामध्ये कोविड उपचार उपलब्ध करण्यासंदर्भात सरकारने जारी केलेली अधिसूचना आज रद्द करून ती तूर्त स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली आहे. या योजनेतून सरकारमान्य खासगी इस्पितळात विनाशुल्क उपचार घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती व त्यासाठीची पॅकेजही या अधिसूचनेत निश्‍चित करण्यात आली होती. ही पॅकेज या सरकारमान्य खासगी इस्पितळांनी मान्य केली नाही. 

सरकारने अगोदरच सुधारित दरामध्ये कोविड उपचार देण्यासंदर्भाचे पॅकेज खासगी इस्पितळांना जारी केली आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत केल्यानंतर घेण्यात आला आहे, असे राणे यांनी सांगितले. ही अधिसूचना रद्द करण्यात आल्याने दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेंतर्गत सरकारमान्य खासगी इस्पितळांमध्ये कोविड उपचार उपलब्ध करण्यासंदर्भातची फाईल पुन्हा नव्याने सरकारकडे पाठविली जाईल व अगोदरची अधिसूचना रद्द करून नवीन अधिसूचना काढली जाईल. सरकारी इस्पितळामध्ये कोविड उपचार मोफत दिला जात असल्याचे ते म्हणाले.
 

संबंधित बातम्या