मडगावातील कोविड इस्पितळ सुरू

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून सुविधांचा आढावा

मडगाव:  येथील नवीन जिल्हा इस्पितळात पुढच्या शनिवारपासून कोविड इस्पितळ सुरू करण्याची शक्यता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केली आहे. राणे यांनी आज गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद  बादेंकर यांच्यासह ज्येष्ठ डॉक्टर व पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा इस्पितळात भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला. 

आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर, गोमेकॉचे  डॉ. सुनंदा आमोणकर,  डॉ. राजेश पाटील,  डॉ. उदय काकोडकर, हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक  डॉ. दिपा कुरैया, इएसआय इस्पितळाचे प्रमुख  डॉ. विश्वजित फळदेसाई यावेळी उपस्थित होते. 

२५० खाटांसह हे इस्पितळ सुरू करण्यात येणार असून टप्प्या टप्प्याने त्यात वाढ करून ही संख्या चारशेपर्यंत नेण्यात येणार आहे. 

या इस्पितळातील ऑक्सिजन व्यवस्था, इतर सुविधा व डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या इस्पितळात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात येतील.यासाठी थोडा वेळ लागणार आहे. पुढच्या शुक्रवारी कोविड इस्पितळ सुरू करण्याच्या विषयावर बैठक होणार आहे पुढच्या शनिवारी हे इस्पितळ सुरू करता येईल, असे राणे यांनी सांगितले. 

घरी विलगीकरणात राहात असलेले कोविड रुग्ण शेवटच्या क्षणी उपचारासाठी धाव घेत असल्याचे निदर्शनास आले असून रुग्णांनी ताप आल्यास व श्वासोश्वासाचा त्रास जाणवू लागल्यास त्वरित वैद्यकीय उपचारासाठी धाव घ्यावी असे राणे यांनी सांगितले.

.. तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालय रद्द
जनतेचा विरोध असल्यास खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव रद्द करण्यात येईल. यात माझा अहंकार आड येणार नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले. 

नवीन जिल्हा इस्पितळाच्या दोन मजल्यांवर खाजगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पण, गोमंतकीय जनतेचा विरोध असल्यास हे महाविद्यालय रद्द करून तिथे आधी निश्चित केल्याप्रमाणे परिचारिका प्रशिक्षण संस्था सुरू करता येईल, असे राणे यांनी सांगितले. सध्या कोविड इस्पितळ सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याच बरोबर जिल्हा इस्पितळासाठी पायाभूत सुविधांचाही विकास करण्यात येणार आहे, असे राणे यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या