कोरोना-19: दुसऱ्या वर्षीही मासेमारी हंगामातील पहिला महिना कोरडा

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

 सलग दुसऱ्या वर्षी हंगामातील पहिल्या महिन्यात मासेमारी करता न आल्याने गोव्यातील मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले असून, मच्छिमार आर्थिक अडचणीत आले आहेत.

मडगाव: सलग दुसऱ्या वर्षी हंगामातील पहिल्या महिन्यात मासेमारी करता न आल्याने गोव्यातील मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले असून, मच्छिमार आर्थिक अडचणीत आले आहेत. उर्वरीत हंगाम खराब गेल्यास मासेमारी व्यवसाय पूर्णपणे कोलमडून जाईल, अशी भीती मच्छिमारबांधव व्यक्त करत आहेत. 

मासेमारीसाठी हंगामाच्या सुरवातीचे व शेवटचे महिने महत्त्वाचे असतात. पण, गोव्यातील मच्छिमारांना सलग दोन वर्षे हंगामातील पहिल्या महिन्यातील मासेमारीला मुकावे लागले आहे. मागच्या वर्षी वादळाच्या तर यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिना मच्छिमारांसाठी कोरडा गेला, असे अखिल गोवा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले. 

यंदा कोरोनाचा मासेमारीवर परिणाम झाला आहे. बिहार, ओरिसा, झारखंड, आंध्र प्रदेश येथे आपल्या गावी गेलेले बहुतांश खलाशी अद्याप परत आलेले नाहीत. त्यामुळे मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. वास्को येथील २५ टक्केच ट्रॅालर मासेमारीसाठी समुद्रात उतरले आहेत, अशी माहिती डिसोझा यांनी दिली. 

अडचणीत सापडलेल्या मच्छिमारांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. मागचा हंगाम संपल्यानंतर गावी गेलेल्या खलाशांना जुलै महिन्यात परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सहकार्य  करण्याचे आश्वासन दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पण, जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे ट्रॅालर मालकांना बिहार, ओरिसा, झारखंड आदी राज्यात बसेस पाठवून खलाशांना गोव्यात आणावे लागले. येथे आल्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा खर्चही ट्रॅालर मालकांना उचलावा लागला. खलाशी पूर्ण संख्येने न आल्याने अनेक ट्रॅालर मासेमारीसाठी समुद्रात उतरवता येत नाहीत, असे डिसोझा यांनी सांगितले. 

मच्छिमारांसाठी हंगामाच्या सुरवातीचा व शेवटचा काळ महत्त्वाचा असतो. या काळातच मासळी बऱ्यापैकी जाळ्यात सापडते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात मच्छिमारांच्या जाळ्यात मासळी सापडत नाही. त्यामुळे मधला काळ मच्छिमारांसाठी नुकसानीचा असतो. यंदाही हंगामाच्या सुरवातीला मासेमारी करता न आल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे, असे डिसोझा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या