कारागृहाच्या धान्यभांडारात खडखडाट 

COLVALE JAIL
COLVALE JAIL

पणजी

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा फटका जाणवत आहे. गेल्या काही महिन्यापासून 
कारागृहाच्या धान्यभांडारात खडखडाट झाल्याने या कैद्यांना नियमानुसार मिळणारा नास्ता तसेच आहार मिळणेही मुष्किलीचे बनले आहे. निकृष्ट दर्जाचा व अपुरा आहार दिल्याने कैद्यांनी उपोषण करत तो आज नाकारला. रात्री उशिरापर्यंत कारागृहामध्ये तणाव निर्माण झाला होता. कारागृहाचे तुरुंग सहाय्यक अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी दिवसभर फिरकलेही नसल्याने कैद्यांमध्ये संतप्त वातावरण होते. 
राज्यातील मध्यवर्ती कारागृहात सुमारे पाचशेहून अधिक कैदी व कच्चे कैदी आहेत. काहीजण शिक्षा भोगत आहेत तर काहीजणांविरुद्ध विविध न्यायालयात खटले सुरू आहेत. राज्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर शिक्षा भोगत असलेले सुमारे १०० जण पॅरोल व फरलोगवर 
कारागृहाबाहेर आहेत. या कारागृहातील कैद्यांना दैनंदिनसाठी लागणारे सामान तसेच खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी एक कँटीन आहे तर 
तेथील स्वयंपाकासाठी लागणारा धान्यसाठ्यासाठी धान्यभांडार आहे. दर महिन्याला धान्यसाठा खरेदी केला जातो मात्र राज्यात कोविड 
- १९ च्या पार्श्‍वभूमीवर कारागृहाला होणारा धान्यसाठा खरेदी करण्यासाठी गृह खात्याकडून आर्थिक सहाय्य वेळेवर मिळत नसल्याने या कारागृहातील नास्ता व आहारवर मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळेच आज सर्व कैद्यांनी कारागृहात सकाळपासून नास्ता घेतला नाही तसेच दुपारचे जेवण घेतले नाही. या कैद्यांमध्ये काही आजारीही आहे तसेच डॉक्टरने त्यांना ठराविक आहार ठरवून दिलेला आहे 
तो त्यांना मिळत नाही. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून कैद्यांमध्ये असलेल्या संतापाचे पडसाद आज त्यांनी आहार नाकारून उमटले. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या फैसला करत नाही व नियमानुसार जो आहार दिला जातो तो देण्याची हमी दिला जात नाही तोपर्यंत 
सध्या दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा आहार न घेण्याचा निश्‍चय केला आहे. 
गेल्या काही महिन्यापासून कारागृहाला धान्यसाठा खरेदी करण्यासाठी नियमित आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळत नाही. त्यामुळे या कारागृह कर्मचारी सामानही खरेदी करू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून आजारी तसेच निरोगी असलेल्या कैद्यांना एकसारखा आहार व नास्ता दिला जात असल्याने अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठविला. मात्र त्यांचा हा आवाज तेथील अधिकारी वरिष्ठांपर्यंत पोहचू देत नाहीत. मधुमेह व रक्तदाब असलेल्या कैद्यांना पाव किंवा कमी गोड पदार्थ नास्त्यासाठी दिले जात होते ते आता बंद झाले आहेत. दुपारी व रात्रीच्यावेळी आहारात भात व डाळ दिले जाते व भाजीचा पत्ताच नसतो. बुधवारी किंवा रविवारीच्या दिवशी कैद्यांना मांसाहारी जेवण दिले जायचे ते सुद्धा खर्चावर काटकसर करण्यासाठी बंद झाले आहे. ही परिस्थिती सरकारकडून आर्थिक मदत वेळेत मिळत नसल्याने ओढवली आहे. त्यामुळे कैद्यांना मिळणाऱ्यावर आहारावर मर्यादा आल्या आहेत. 
या कारागृहात एक कँटीन आहे त्यामध्ये कैद्यांना स्वतःसाठी लागणाऱ्या वस्तू तसेच खाद्यपदार्थ त्यातून खरेदी करता येतात. या वस्तू खरेदीवर यापूर्वी मर्यादा नव्हती मात्र गेल्या काही महिन्यापासून त्यावर कारागृहाच्या व्यवस्थापनाकडून मर्यादा घालण्यात आली आहे. प्रत्येक कैद्याला एक हजार रुपयांपर्यंतच खरेदीसाठी परवानगी दिली आहे. धान्यभंडाराची स्थिती तर खूपच वाईट आहे. कारागृहात गव्हाचे पीठ नसल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून चपात्या आहारात देणे बंद आहे. भाजीही आणली जात नाही. कांदा व इतर कडधान्यांचीही उणीव आहे. सध्या ताटभर भात व कमी कांदा असलेली पाण्यासारखी अपुरी पातळ डाळ स्टीलच्या मगमध्ये दिली जाते. त्यामुळे मधुमेह असलेल्या कैद्यांना उपाशी राहण्याची वेळ अनेकदा येत आहे. 
या कारागृहात कोविड - १९ ची मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नाही. कैद्यांबरोबर तेथील तुरुंग कर्मचारीही तोंडाला मास्क लावत नाही तसेच सामाजिक अंतरही ठेवत नाही. काही तुरुंग अधिकारी या कैद्यांना घाबरूनच त्यांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगत नाही. कारागृहात सॅनिटायझर्स तसेच मास्क सुरुवातीला उपलब्ध केले मात्र त्यानंतर पुन्हा ते आणण्यात आले नाही. सॅनिटायझर्स 
उपलब्ध नाहीत त्यामुळे कारागृहात मार्गदर्शक सूचनांचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. 

कारागृहामध्ये नेहमीपेक्षा कमी कैदी असूनही खरेदीची बिले भरमसाट तयार केली जात आहेत. तेथील कैदी व तुरुंग कर्मचारी यांच्यात कटकारस्थान असल्याचा संशयआहे. त्यामुळे खरेदीच्या खर्चावर नियंत्रण आणले गेले आहे. आज कैद्यांना जे दुपारी जेवण दिले गेले त्याबाबतची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये फक्त भात व डाळ याचा समावेश होता. कडधान्ये व स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू काही प्रमाणात संपल्या आहेत हे मान्य आहे. त्यासाठी खात्याकडून धान्यसाठा व इतर सामान खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती तुरुंग महानिरीक्षक गुरुदास पिळर्णकर यांनी दिली. 
 

 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com