‘संजीवनी’चे परराज्‍यातही होते अप्रुप

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

साखर कारखान्‍याबाबत भाऊसाहेबांना लिहिली होती अनेक पत्रे : तज्ज्ञांचीही केली होती शिफारस

पणजी

गोव्‍याचे भाग्यविधाते व पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्या कारकिर्दीत संजीवनी सहकारी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याची दखल त्यावेळी राज्याबाहेरही घेतली गेली होती. इतर राज्यांतील जिल्ह्यांच्या तुलनेत आकाराने निम्मेही नसलेले गोवा राज्य साखर कारखाना सुरू करते याचे अप्रुप अनेकांना होते. तशी पत्रेही काही जणांनी भाऊसाहेबांना त्यावेळी पाठवली होती.
त्यापैकीच एक पत्र ना. ल. करकरे (पुणे) यांचे आहे. त्यांनी हे पत्र ३ नोव्हेंबर १९६५ रोजी लिहिले होते. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले की, कारखान्यासाठी १० हजार एकर जमिनीत उस लागवड करण्यात येणार आहे. हा उपक्रम फार स्तुत्य आहे. उत्तम प्रकारे अनुभवी माणसे हाताशी धरली, तर प्रथमपासून भरघोस यश प्राप्त होण्यास हरकत नाही. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नगर साखर कारखाना व इतर कारखाने नजरेखाली जरूर घालावेत. जरूर तर त्यांचे १०-१५ ‘मास्तर लोक’ घेऊन यावेत. म्हणजे ते बरोबर आखणी करून उस लागवडीसाठी जमीन तयार करून देतील. चुका होऊ नयेत आणि नुकसानी होऊ नये यासाठी आपुलकीने पत्र लिहीत आहे. ‘थिअरी आणि प्रॅक्टिस’ हे फार वेगळे असते. त्यात हजारो रुपये बरबाद होतात म्हणून लिहित आहे.

तेव्‍हाही आली होती
अर्थव्‍यवस्‍था डबघाईला!

भाऊसाहेबांना मुक्तीनंतरच्या गोव्याचे शिल्पकार मानले जाते. गोवा मुक्त झाला तेव्हा येथील अर्थव्यवस्था मध्ययुगाला साजेशीच होती. शेती व काही प्रमाणात बागायती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय, पण तोही मागासलेला. पोर्तुगीज सरकारला आर्थिक विकास घडवून आणण्याचा विचारच कधी सूचला नव्हता. गोव्याची अर्थव्यवस्था फार डबघाईला आल्याचे उल्लेख जुन्या इतिहास दप्तरात सापडतात. भाऊसाहेबांनी शेती व बागायतीच्या विकासाच्या मर्यादा ओळखून हे व्यवसाय बहुमुखी बनवण्याचे ठरवले. महाराष्ट्रात साखर उद्योगामुळे कायाकल्प घडून आल्याचे उदाहरण डोळ्यांसमोर असल्याने, गोव्यात पण महाराष्ट्राप्रमाणेच सहकारी तत्वावर साखर कारखाना उभारण्याचा संकल्प त्यांनी केला.

म्‍हणून बांधले साळावली धरण...
उसाच्या लागवडीसाठी पाणी पुरवठ्याची अडचण लक्षात घेऊन साळावली नदीवर धरण बांधले. साळावली प्रकल्प आज दक्षिण गोव्याची तहान भागवत असला, तरी तो मूळ पाटबंधारे प्रकल्प होता. या धरणाचे पाणी सासष्टी, सांगे, केपे या तीन तालुक्यांत खेळवून मोठे क्षेत्र ऊस लागवडीखाली आणण्याचा हेतू यामागे होता. त्यानुसार संजीवनी साखर कारखाना उसगाव येथे उभा राहिला. पण, ऊस लागवड फारशी झाली नाही.

अंदाज फसला आणि...
ऊस हे नगदी पीक असल्याने अधिकाधिक शेतकरी उस लागवडीकडे वळतील हा त्यांचा अंदाज खोटा ठरला आणि कारखाना पांढरा हत्ती बनला. आता तर तो बंद होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. करकरे यांनी वर वर उल्लेख केलेल्या पत्रात कारखान्यासाठी योजक हवा, असे नमूद केले होते. भाऊसाहेबांनंतर ‘योजकस्तत्र दुर्लभः’ याचा अनुभव कारखन्याला आला असण्याचीच शक्यता अधिक आहे.

संबंधित बातम्या