क्राईम ब्रँचची पाणघोड्यांच्या सुळ्यांच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

पाणघोड्यांच्या सुळ्यांच्या तस्करीप्रकरणातील फरारी असलेल्या विष्णू हरमलकर (२४) व अनिल पार्सेकर (३०) या दोघांना गोवा व कर्नाटक वन अधिकाऱ्यांनी गोव्याच्या क्राईम ब्रँचच्या मदतीने अटक केली. 

पणजी: पाणघोड्यांच्या सुळ्यांच्या तस्करीप्रकरणातील फरारी असलेल्या विष्णू हरमलकर (२४) व अनिल पार्सेकर (३०) या दोघांना गोवा व कर्नाटक वन अधिकाऱ्यांनी गोव्याच्या क्राईम ब्रँचच्या मदतीने अटक केली. 

कर्नाटकमध्ये तस्करी करण्यामध्ये या दोघांचा हात असल्याची कर्नाटक वन अधिकाऱ्यांना चौकशीत आढळल्याने ते गोव्यात आले होते. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये पाणघोड्याच्या सुळ्यांची तस्करी करण्यासाठी ग्राहक शोधणाऱ्या टोळीला वन खात्याच्या पथकाने गजाआड केले होते. 

या टोळीतील संशयितांची चौकशी केली असता ही तस्करी गोव्यातून झाल्याचे निष्पन्न झाले होते व या दोघांची नावेही समोर आली होती. या टोळीला अटक केल्यावर हे दोघेही फरारी झाले होते. त्यामुळे कर्नाटक वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या दोघांची माहिती गोव्याच्या वन अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर त्यांनी क्राईम ब्रँचची मदत घेतली. 

क्राईम ब्रँचने या दोघांची माहिती काढल्यावर सापळा लावला. त्यानंतर कर्नाटक व गोवा वन खात्याच्या पथकासमवेत कारवाई करत त्यांना गजाआड केले.पाणघोड्याच्या सुळ्यांची तस्करी गोव्यातून कर्नाटकमध्ये झाल्याने गोव्यातील हद्दीवरील तपासणी नाक्यांबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

राज्याच्या सर्व हद्दीवरील चेकनाक्यावर पोलिस, जकात व वन खात्याचे पथक असते त्यामुळे ही तस्करी झाल्याने तपासणीच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची गंभीर दखल गोवा वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या