स्वप्नील वाळके खूनप्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

एखाद्या प्रकरणाचे तपासकाम रखडले, संशयित हाती लागत नसले, तर त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवले जाते.

मडगाव: राज्यभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या सराफ स्वप्नील वाळके खून प्रकरणाचा तपास अखेर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागातील गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. मडगाव शहरात दिवसाढवळ्या हा प्रकार घडूनही या प्रकरणातील पहिल्या दोन संशयितांना पकडण्यात गुन्हे शाखेलाच यश आले होते. नंतर मुख्य संशयित मडगाव पोलिसांना शरण आला तरी त्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पणजीत घेतलेला शोध आणि केलेला पाठलाग कारणीभूत ठरला अशीही माहिती नंतर उजेडात आली होती.

यामुळे या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे गुन्हे शाखेकडे जातील असे वाटत होते. या घटनेनंतर लगेच ज्या पद्धतीने गुन्हे शाखेला तपासकामात सामावून घेण्यात आले, त्यावरून याचे तपासकाम मडगाव पोलिसांकडून नंतर काढून घेतले जाणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. एखाद्या प्रकरणाचे तपासकाम रखडले, संशयित हाती लागत नसले, तर त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवले जाते. स्वप्नील वाळके खून प्रकरणात मुख्य संशयित मुस्तफा शेख, अन्य संशयित एडसन गोन्साल्‍विस आणि ओंकार पाटील दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत गेले असतानाच याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्‍हे शाखेचे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील हे करणार आहेत.

पणजीतील पोलिस मुख्यालयात पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी आज दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार आणि गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हे तपासकाम गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार यांनी तपासाची कागदपत्रे हस्तांतरीत करण्यात येत असल्याचे त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या