आसय डोंगरी येथे गुन्हेगाराचा खून

प्रतिनिधी
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

उपचारादरम्यान मृत्यू, पाचजणांना अटक, सात दिवस रिमांड

मुरगाव: चिखली पंचायत क्षेत्रातील आसय डोंगरी येथे सोमवारी रात्री निकेश लोट या सराईत गुन्हेगारावर खुनी हल्ला झाल्याने त्याचे उपचारादरम्यान बांबोळी येथील गोवा मेडिकल काॅलेज इस्पितळात निधन झाले.याप्रकरणी वास्को पोलिसांनी भा.दं.सं.च्या ३०२  कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंद  करून पाच जणांना अटक केली.न्यायालयाने त्यांना सात दिवस रिमांडवर पोलिस कोठडीत पाठविले आहे.

वास्कोचे  पोलिस निरीक्षक निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आसय डोंगरी येथे सोमवारी रात्री घडली. साईल,साईफ आणि शकिब हे तिघेजण कारने आपल्या मित्राला आसय डोंगरी येथे सोडण्यास गेले होते. मित्राला सोडून परत येताना निकेश लोट याने त्यांची कार अडवून हुज्जत घालायला सुरुवात केली. चौघांमध्ये कडाक्याचे भांडण चालू असताना याची खबर पोलिसांना मिळाल्यावर वास्को पोलिस घटनास्थळी 
गेले.
पोलिस वाहन पाहून निकेश पळ काढीत असताना अर्जुन(नानी) नाईक याने दंडुक्याने  त्याच्यावर प्रहार  करून त्याला जबर जखमी केले तर युवराज  याने निकेशच्या डोक्यावर भलामोठा सिमेंटचा फ्लाॅवरपाॅट हाणल्याने तो घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. वास्को  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निकेश याला तातडीने गोमेकॉत दाखल केले.त्याची प्रकृती चिंताजनक असताना मंगळवारी सायंकाळी त्याचे निधन 
झाले. 
वास्को पोलिसांनी भा. दं.सं.च्या ३०२ कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंद करून पाच हल्लेखोरांना  गजाआड केले आहे. त्यांना न्यायालयाने सात दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत पाठविले आहे. याप्रकरणी अधिक तपास निरीक्षक  निलेश राणे करीत आहेत.
दरम्यान, हल्ल्यात ठार झालेला निकेश लोट सराईत गुन्हेगार होता. हल्लीच तो शिक्षा भोगून जामीनावर मुक्त झाला होता.त्याच्यावर महिलांची छेडछाड काढणे, मारामारी, तसेच बाल हक्क कायद्याखाली गुन्हा नोंद झालेला आहे.
 

संबंधित बातम्या