गोव्यातील नागरिक असुरक्षित? २०२० मध्ये गुन्हेगारीत २० टक्क्यांनी वाढ

Crime rate in Goa has been increased by 20 percents in the year 2020
Crime rate in Goa has been increased by 20 percents in the year 2020

पणजी :  मागील २०२० वर्षाने कोविड महामारीमुळे भयभीतीचे वातावरण निर्माण केले. त्याचबरोबर राज्यामध्ये गुन्हेगारीतही २० टक्के वाढ झाली. गेल्या वर्षात ३४ खुनांची नोंद झाली. मात्र, सर्व प्रकरणांचा छडा लागला. बलात्काराची ५७ पैकी ५६ प्रकरणांमध्ये संशयितांना गजाआड करण्यात आले. २०२० मध्ये भादंसं व इतर कायद्याखाली ४३६६ गुन्हे दाखल झाले, तर २०१९ मध्ये ही संख्या ३७२७ होती. सरत्या वर्षात ६३९ गुन्हे वाढले आहेत. मात्र, मटका व अंमलीपदार्थाच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 

२०२० मध्ये ३४ खून, २३ खुनाचा प्रयत्न, ५७ बलात्कार, २८ सोनसाखळ्या खेचणे, १२० फसवणूक, ४२ हिंसक घटनांची व १२२ भीषण अपघातांची नोंद झाली आहे. या उलट २०१९ मध्ये ३३ खून, ३२ खुनाचा प्रयत्न, ७२ बलात्कार, ३८ सोनसाखळ्या खेचणे, १२७ फसवणूक, १०५ हिंसक घटनांची व १८० भीषण अपघातांची नोंद झाली होती. २०१९ वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये भादंसंच्या कलमाखाली ३३९३ गुन्हे नोंद झाले त्यापैकी ३०९१ प्रकरणांचा छडा लागला आहे. इतर कलमाखाली ९७३ गुन्हे दाखल झाले त्यात देहविक्रय ४ प्रकरणे, अंमलीपदार्थाची १४७ प्रकरणे, मटका ६८५ प्रकरणे, इतर जुगार ३४ प्रकरणांचा समावेश आहे. २०१९ मध्ये भादंसंच्या कलमखाली २४६५ प्रकरणांपैकी २०६४ प्रकरणांचा तपास लागला होता. इतर कलमाखाली १२६२ गुन्हे नोंद झाले त्यामध्ये देहविक्रय १६, अंमलीपदार्थाची २१८ प्रकरणे, मटका ८७५ प्रकरणे, इतर जुगार ३८ प्रकरणांचा समावेश आहे. 

२०२० मध्ये उत्तर गोव्यात दरोडा, जबरी चोरी, दिवसा-रात्री चोऱ्या व इतर चोऱ्या मिळून २९५ प्रकरणे, दक्षिण गोव्यात २११ तसेच कोकण रेल्वे व किनारपट्टी पोलिसांनी नोंद केलेली मिळून ५१२ प्रकरणे नोंद झाली त्यापैकी ३१८ प्रकरणांचा शोध लागला उर्वरित १९४ प्रकरणांमधील चोरटे अजूनही गायब आहेत. २०१९ मध्ये उत्तर गोव्यात दरोडा, जबरी चोरी, दिवसा-रात्री चोऱ्या व इतर चोऱ्या मिळून ३५२ प्रकरणे, दक्षिण गोव्यात२७६ तसेच कोकण रेल्वे व किनारपट्टी पोलिसांनी नोंद केलेली मिळून ६५४ प्रकरणे नोंद झाली त्यापैकी ३६७ प्रकरणांचा शोध लागला उर्वरित २८७ प्रकरणांमधील चोरटे अजूनही गायब आहेत. त्यामुळे २०१९ व २०२० या दोन्ही वर्षात सुमारे ४८३ चोरीच्या प्रकरणांचा सुगावा लागलेला नाही. 

गोवा हे अंमलीपदार्थाचे विक्री केंद्र गेल्या काही वर्षात उघड झाले आहे. आता राज्यात गांजाचेही उत्पादन फ्लॅटमध्ये व जमिनीत चोरून केले जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. २०२० मध्ये अंमलीपदार्थ प्रकरणांची संख्या २०१९ पेक्षा कमी झाली असली तरी अंमलीपदार्थ मात्र जादा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२० मध्ये उत्तर गोव्यात ६६ प्रकरणे, दक्षिणेत ४०, अंमलीपदार्थविरोधी कक्षाने २६ तरे गुन्हे शाखेने १६ प्रकरणे नोंद केली. या एकूण प्रकरणामध्ये १७२ जणांना अटक करण्यात आली त्यामध्ये ५५ गोमंतकीय, ८२ परप्रांतीय, ३६ विदेशी नागरिकांचा समावेश होता. १५०.६८३ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला त्यामध्ये गांजाचे प्रमाण अधिक आहे व या एकूण ड्रग्जची किंमत ७ कोटी ८ लाख ५० हजार ३५० रुपये आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा या बेकायदेशीर ड्रग्ज व्यवसायावर परिणाम झाला नाही.  

२०१९ मध्ये अंमलीपदार्थाचे विक्रमी २१९ प्रकरणे नोंद केली गेली होती त्यामध्ये उत्तरेत ९२, दक्षिणेत ८२, अंमलीपदार्थविरोधी कक्षाने २७ तर गुन्हे शाखेने १६ प्रकरणे नोंद केली होती. या प्रकरणामध्ये २४४ जणांना अटक करण्यात आले होते त्यामध्ये ७६ गोमंतकीय, १०८ परप्रांतीय, ६० विदेशी नागरिकांचा समावेश होता. त्या वर्षी ८५.२१७ किलो अंमलीपदार्थ जप्त करणयात आला त्याची किंमत सुमारे ६ कोटी ३९ लाख २७ हजार ६०० रुपये होती.

अमलीपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध पोलिस यंत्रणा सक्रिय

राज्यात २०२० मध्ये अंमलीपदार्थाची प्रकरणे कमी झाली यावरून पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्याने ड्रग्ज विक्रेत्यांवर नियंत्रण आले आहे. अर्ध्याहून अधिक गांजांची प्रकरणे नोंद झाली आहेत. खुलेआमपणे ड्रग्ज मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कमी प्रकरणे मागील वर्षात नोंद झाली. ड्र्ग्ज विक्रेतेही पोलिस यंत्रणेच्या कारवाईमुळे वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबत असल्याने पोलिसांनाही त्यानुसार कारवाईसाठी वेगवेगळ्या योजना तयार कराव्या लागत आहे. पोलिस खात्याचे विविध विभाग किनारपट्टी भागात सक्रीय झाले असल्याने बऱ्याच प्रमाणात ड्रग्जचे प्रमाण कमी झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com