पेडणे पोलिस हद्दीत गुन्हे वाढले!

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पेडणे तालुक्यात एकूण २० ग्रामपंचायती, एक पेडणे पालिका यांचा समावेश आहे. किनारी भाग असल्यामुळे पेडणे पोलिस स्‍थानक तालुक्यासाठी कमी पडते. त्यासाठी किनारी भागासाठी खास पोलिस स्‍थानकाची गरज आहे. पोलिसांनी केलेल्‍या दोन कारवाईवेळी तालुक्यात गांजा लागवड केली जात असल्‍याचे उघड झाले होते.

 मोरजी : पेडणे तालुक्यात एकूण २० ग्रामपंचायती, एक पेडणे पालिका यांचा समावेश आहे. किनारी भाग असल्यामुळे पेडणे पोलिस स्‍थानक तालुक्यासाठी कमी पडते. त्यासाठी किनारी भागासाठी खास पोलिस स्‍थानकाची गरज आहे. पोलिसांनी केलेल्‍या दोन कारवाईवेळी तालुक्यात गांजा लागवड केली जात असल्‍याचे उघड झाले होते. तसेच लहानमोठे गुन्हेही दरदिवशी घडतात. अमलीपदार्थाचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असल्‍याचे कारवाईमुळे उघड झाले. त्‍यामुळे पेडणे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात खास स्वतंत्र पोलिस स्‍थानकाची गरज आहे. पर्यटन हंगामात होणारे गैरव्यवहार, संगीत रजनी, अमलीपदार्थ या सारख्या गुन्ह्यात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्‍याचे गांभीर्य ओळखून खास पोलिस स्‍थानकाची निर्मिती केली जाणार आहे.

या विषयी स्थानिक आमदार तथा पर्यटन विकास महामंडळ चेअरमन दयानंद सोपटे यांच्याकडे संपर्क साधला असता किनारी भागात होणारे गैरव्यवहार नियंत्रणात आणण्यासाठी स्वतंत्र पोलिस स्‍थानक उभारले जाणार आहे. त्यासाठी मांद्रे जुनासवाडा या ठिकाणी जागेची निवड केली आहे. लवकरच पाहणी करून पोलिस स्‍थानकासाठी प्रक्रिया केली जाईल, असे दयानंद सोपटे यांनी सांगितले. पेडणे तालुक्यात वाढती गुन्हेगारी, किनारी भागातील अमलीपदार्थ तो आता गावातही पोहोचलेला आहे. वेश्याव्यवसाय, ध्वनीप्रदूषण, वायू प्रदूषण, वाहनांचे प्रदूषण, बैलाच्या झुंजी, रेती चिरे, जुगार, मटका, यावर आळा घालण्यासाठी किनारी स्वतंत्र पोलिस स्‍थानकाची गरज आहे. तालुक्यात मागच्या १० वर्षातील आढावा घेतला, तर गुन्हेगारांची साखळी वाढते वाढत आहे. त्यावर पेडणे पोलिसांना नियंत्रण मिळवता आलेले नाही. पेडणे पोलिस ठाण्याची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे. पेडणे पोलिस स्‍थानकाला जिल्हा पोलिस स्‍थानकाचा दर्जा द्यायला हवा.

अशाही तक्रारी ?
काही विदेशी महिला युवती आपला विनयभंग केल्याचा, आपल्यावर अत्याचार  केल्याच्या खोट्या तक्रारी देऊन काही जणांना फसवत असतात. त्यांना आपल्यावर अत्याचार  झालाचा पोलिस अहवाल महत्त्‍वाचा असतो आणि तक्रार करून ते आपल्या देशात पळून जातात. दिलेल्या तक्रारीचा ते कधीच पाठपुरावा करत नाही. विनाकारण स्थानिक आणि बिगर गोमतकीयांनाही ते पर्यटक फसवतात. 

मसाज सेंटर उदंड जाहले!
किनारी पर्यटन हंगाम सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात मसाज सेंटरचे पेव फुटते. या मसाज सेंटरमधून नक्की काय चालते, हे स्थानिक पंचायतीलाही माहित नसते. कारण, स्थानिक पंचायतीकडून मसाज सेंटर परवाने घेत नसतात. काही मसाज सेंटरमध्‍ये युवती पुरुषांना आणि पुरुष युवतींना मसाज करतात.

संबंधित बातम्या