फिल्मी स्टाईलने कुख्यात गुंडाच्या आवळल्या मुसक्या

‘मोस्ट वॉन्टेड’ गुंड विक्रांत देशमुख ऊर्फ विकी याच्याविरुद्ध नेरूल येथील खून तसेच ‘मोक्का’ गुन्ह्याच्या तपासात तो हवा होता.
Criminal Arrested in Panjim
Criminal Arrested in PanjimDainik Gomantak

पणजी : रविवारी पहाटे दोनची वेळ. कुख्यात गुंड विक्रांत देशमुख ऊर्फ विक्की हा त्याच्या अलिशान गाडीजवळ आला. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिस पथकातील कर्मचारी मनोज पेडणेकर यांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याच्या नावाने हाक मारताच विकीने तेथून पळ काढला. यावेळी मनोज यांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून डेल्टिन कॅसिनोच्या प्रवेशद्वारावर त्याला पकडले. गुंड विकी हा पिस्तुल वा धारदार शस्त्राने हल्ला करण्याची शक्यता असूनही मनोज यांनी मोठे धाडस करत विकीला पकडले.

गुंड विक्रांत देशमुख ऊर्फ विकी याला खून, दरोडे व खंडणी या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. सुमारे 10 वर्षे तो कारागृहात होता. काही प्रकरणांत सशर्त जामिनावर असतानाही खंडणी व खून यासारखे गुन्हे करून तो फरारी होता. नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचचे सेंट्रल युनिटचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर तो गोव्यात येणार असल्याचे कळल्यावर दोन दिवसांपूर्वी त्यांनी गोव्‍यातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सापळा रचला.

रविवारी पहाटे दोनच्या सुमारास संशयित विकी कॅसिनोमधून बाहेर पडला. महाराष्ट्रात नोंद असलेली फोर्च्युनर गाडी पणजी पोलिसांनी शोधली होती. ही गाडी जुन्या सचिवालयाच्या मागील बाजूल पार्किंग क्षेत्रात उभी करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे पणजीचे पोलिस कॉन्स्टेबल मनोज पेडणेकर यांनी स्वतःची खासगी गाडी या गाडीच्या मागे ठेवली होती. विकीने मनोज यांना गाडी काढण्यास सांगितले. त्यावेळी मनोजने त्याचे विकी असे नाव घेतले असता तेथून पळ काढण्यास त्याने सुरूवात केली. त्याने शस्र नसतानाही धाडस करून त्याचा पाठलाग सुरू केला. तेथे जवळच साध्या वेशात असलेल्या पोलिसांनीही त्याचा मागोमाग धावण्यात सुरवात केली. एखादा चित्रपटाच्या स्टाइलमध्ये पोलिसांनी पाठलाग सुरू केला.

डेल्टिन जॅक कॅसिनो प्रवेशद्वारापर्यंत पाठलाग केल्यानंतर कॉन्स्टेबल मनोज पेडणेकर यांनी त्याच्यावर मागून धावत जाऊन झडप घातली व त्याला पकडले. मागोमाग धावत असलेले पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले व त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता मोबाईल सापडला. त्याच्या गाडीची झडती घेण्यात आली. त्यामध्ये पाच जिवंत काडतुसे असलेले पिस्तुल सापडले.

Criminal Arrested in Panjim
बलात्कार पीडितेचा जबानी देण्यास नकार; आरोपी मोकाट

कुविख्यात गुंड विकी हा हत्यारे वापरत असतानाही त्याला गजाआड करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल्सना मदतीला घेण्यात आले होते. मात्र, कॉन्स्टेबल्सना पिस्तुल देण्यात आले नव्हते. कॅसिनोत जाताना त्याने पिस्तुल गाडीतच ठेवले होते. या कारवाईवेळी त्याच्याकडे पिस्तुल असते तर त्याने पोलिसांना धमकावण्यासाठी पिस्तुलने गोळ्या झाडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. हे प्रकरण पोलिसांच्या जीवावरही बेतले असते. यामधून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईवेळी केलेला हलगर्जीपणा दिसून आला.

‘मोस्ट वॉन्टेड’ गुंड विक्रांत देशमुख ऊर्फ विकी याच्याविरुद्ध नेरूल येथील खून तसेच ‘मोक्का’ गुन्ह्याच्या तपासात तो हवा होता. शनिवारी तो पणजीतील कॅसिनोवर येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती गोव्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यानुसार तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पणजी पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर त्याला ट्रान्सिट वॉरंटवर मुंबईत चौकशीसाठी नेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह भोसले यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com