Goa Sports News| गोव्यातील फुटबॉलमध्ये ‘फॅमिली राज'

संलग्न क्लब आक्रमक: जीएफए अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांच्यावर टीकास्त्र
Churchil Alemao
Churchil AlemaoDainik Gomantak

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनचे (जीएफए) अध्यक्ष चर्चिल आलेमाव राज्य फुटबॉलमध्ये ‘फॅमिली राज’ला प्राधान्य देत असल्याचा आरोप करत काही संलग्न क्लब आक्रमक झाले आहेत. जीएफए संलग्न क्लबनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत ‘फॅमिली राज’चा (घराणेशाही) पुरस्कार करत असल्याबद्दल चर्चिल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) नुकत्यात झालेल्या कार्यकारी समिती निवडणुकीत चर्चिल यांच्या कन्या वालंका सदस्यपदी बिनविरोध ठरल्या. महासंघाच्या 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच समितीत महिला निवडून आली आहे.

(Criticism of GFA President Churchill Alemao)

Churchil Alemao
Goa Covid Update| गोव्यात राष्ट्रीय स्तरापेक्षाही चौपट संक्रमण दर

क्लब सां मिगेल द ताळगावचे अध्यक्ष अँथनी लेव्हिनो परेरा यांनी थेट आरोप केला. हल्लीच झालेल्या एआयएफएफ कार्यकारी समिती निवडणुकीसाठी जीएफए अध्यक्षांनी संघटनेच्या प्रतिनिधी या नात्याने आपली मुलगी वालंका यांना प्रतिनिधित्व बहाल केले. जीएफए कार्यकारी समितीत सक्षम सदस्य असतानाही चर्चिल यांनी आपल्या मुलीची निवड केली, असे परेरा यांनी जीएफए अध्यक्षांवर हल्ला चढविताना सांगितले. ‘‘जीएफए अध्यक्ष घटनाबाह्य पद्धतीने कार्यरत आहेत. जीएफए घटनेस न जुमानता आणि बेकायदेशीरपणे ते खुर्चीला चिकटून आहेत. त्यांचा कार्यकाळ 31 जुलै 2022 रोजी संपुष्टात आलेला आहे,’’ असे परेरा यांनी सांगितले.

जीएफए घटनेचे उल्लंघन ः परेरा

अँथनी लेव्हिनो परेरा सांगितले, की ‘‘जीएफए घटना कलम 22 नुसार प्रत्येक चार वर्षांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक व्हायला हवी. तसे करण्यास अध्यक्ष अपयशी ठरले. 31 जुलैला झालेल्या आमसभेच्या विषयपत्रिकेतून निवडणुकीचा विषय वगळण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभा संपण्यापूर्वी जीएफए सदस्यांनी ही बाब आमसभेच्या निदर्शनास आणून दिली, तसेच अध्यक्ष व कार्यकारी समितीची मुदत संपल्याचेही नजरेस आणून दिले, तथापि, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत अध्यक्ष व सचिवांनी सभा आटोपती घेतली.’’

ग्राम स्पर्धा मरणासन्न अवस्थेत

गिरदोली क्लबचे अध्यक्ष पॅटविन फिझार्दो यांनी जीएफए अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांच्यावर खुल्या स्पर्धांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. यामुळे ग्रामपातळीवरील फुटबॉल स्पर्धा मरणासन्न अवस्थेत असल्याचा त्यांचा दावा आहे. 2018 -19मोसमात आपल्या क्लबने जीएफए तृतीय विभागीय स्पर्धा जिंकली, पण अजून बक्षीस रक्कम देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Churchil Alemao
Goa Drug Case| हणजुणेत साठ हजारांचे ड्रग्स जप्त

साठ दिवसांत निवडणूक हवी

संलग्न क्लब प्रतिनिधींनी संयुक्त पत्रकार परिषदेत, जीएफए निवडणूक येत्या 60 दिवसांत घेण्याची मागणी केली. निवडणुकीची तारीख जाहीर केली नाही, तर जीएफए अध्यक्ष या नात्याने चर्चिल आलेमाव बेकायदेशीर निर्णय घेऊन गोमंतकीय फुटबॉल आणि जीएफएची हानी करत असल्याचे समजू असा इशाराही क्लब प्रतिनिधींनी दिला.

‘‘जीएफए कार्यकारी समितीला विश्वासात न घेता एआयएफएफ निवडणुकीसाठी चर्चिल यांनी वालंका आलेमाव यांची बेकायदेशीर नियुक्ती करून घराणेशाहीस प्रोत्साहन दिले. ही जीएफए घटनेची पायमल्ली आहे. जीएफए-एआयएफएफच्या संबंधित योग्य न्यायिक मंचाने याची दखल घ्यावी हा आमचा प्रस्ताव आहे.’’

- जीफए संलग्न क्लब संयुक्त प्रतिनिधी

विरोधातील संलग्न क्लबांची मागणी

- संबंधित अधिकारिणीने तातडीने जीएफए अध्यक्षपदावरून चर्चिल आलेमाव यांना खाली उतरण्यास भाग पाडावे

- जीएफए नैतिकतेनुसार संघटनेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी

- निवडणूक होईपर्यंत जीएफएवर प्रशासकाची नियुक्ती करावी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com