अडकलेल्यांना गोव्यात आणण्यात चालढकलपणा, शिवसेनेची टीका

dainik gomantak
शनिवार, 9 मे 2020

‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून राजकारण केले जात असल्याची टीका शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केली आहे.

पणजी, 

क्रुझ बोटीवर अडकलेल्या गोमंतकिय दर्यावर्दींना गोव्यात आणण्यास राज्य सरकार केंद्राशी संपर्क करून प्रयत्न करत आहे. मात्र, तीच तत्परता गोव्याबाहेर अडकलेल्या गोमंतकियांना आणण्यास सरकारकडून प्रयत्नांऐवजी चालढकलपणा होत आहे. ‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून राजकारण केले जात असल्याची टीका शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केली आहे.
पणजीतील शिवेसना कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना कामत म्हणाले की, गोव्याबाहेरील राज्यात अनेक गोमंतकिय टाळेबंदी सुरू झाल्यापासून अडकून पडलेले आहेत. सरकारने ज्या हेल्पलाईन सेवा सुरू केलेल्या आहेत त्याची कोणीच दखल घेत नाही. काहींनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील ईमेलवर संपर्क साधला मात्र त्या कार्यालयातून कोणतेच उत्तर दिले जात नाही. ही हेल्पलाईन सुविधेसाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडूनही कोणताच प्रतिसाद संपर्क साधणाऱ्यांना मिळत नाही. पुण्यामध्ये सुमारे ५० ते ६० जणांचा मूळ गोमंतकियांचा गट अडकला आहे. त्यांच्याकडे असलेले पैसे संपत आल्याने राहणे मुष्किल बनले आहे. शिवसेनेतर्फे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात ईमेल पाठविला गेला मात्र त्याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ईमेल पाठविल्यास त्याला २४ तासात उत्तर दिले जाते. गोव्यातील शिवसेनेतर्फे या पुण्यातील गोमंतकिय गटाला परतण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांच्या मदतीने प्रयत्न करण्यात येत आहे मात्र त्यांना गोवा सरकारकडून कोणतीच मदत आजपर्यंत मिळाली नसल्याचे या गटाने सांगितल्याची माहिती कामत यांनी दिली.
गोव्यातील अनेकजण टाळेबंदीमुळे शेजारील राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. काहीजण कामानिमित्त गोव्याबाहेर होते त्यांना परतायचे आहे मात्र शक्य होत नाही. मिळालेल्या माहितीनुसार केबिनेट दर्जाच्या एका आमदाराच्या मुलाला मुंबईतून गोव्यात आणण्यासाठी त्वरित यंत्रणा वावरते तर गोव्याबाहेर अडकलेल्यांना आणण्यासाठी सरकारकडून सापत्नभावाची वागणूक का दिली जाते असा प्रश्‍न कामत यांनी उपस्थित केला आहे. यावरून सरकार हे राजकारण करत आहे. राजकारणी हे गोमंतकियांचे हित न पाहता मात्र स्वतःचे हित पाहत आहेत. मुंबईत एका इस्पितळात अडीच वर्षाच्या मुलाला विमानातून गोव्यात आणण्याची गरज आहे तसेच इतरही काही रुग्ण अडकलेले आहेत मात्र त्यांच्यासाठी गोवा सरकारकडून काहीच प्रयत्न होत नाही मात्र परदेशातील तारवटींना चार्टर विमानाने गोव्यात आणण्यास प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या या कार्यपद्धतीची शोकांतिका आहे. सरकारकडून समान वागणूक व प्रयत्न केले जात नाही. सरकारने गोव्याबाहेर अडकलेल्यांना गोव्यात आणण्यासाठी दुजाभाव न करता त्यांना येण्यासाठी पर्यायी सोय करावी अशी मागणी कामत यांनी केली.

संबंधित बातम्या