मिळकतीच्या दाखल्यांसाठी वास्कोत महिलांची गर्दी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

गृह आधार योजनेसाठी आवश्यक असलेले मिळकतीचे दाखले मिळविण्यासाठी वास्कोत महिलांना अनेक त्रास काढावे लागत आहेत. कारण गृह आधार योजनेच्या लाभार्थी महिलांनी नूतनीकरण करण्यासाठी नव्याने मिळकतीचा आणि निवास दाखला समाज कल्याण खात्याला सादर करायचा आहे.

मुरगाव : गृह आधार योजनेसाठी आवश्यक असलेले मिळकतीचे दाखले मिळविण्यासाठी वास्कोत महिलांना अनेक त्रास काढावे लागत आहेत. कारण गृह आधार योजनेच्या लाभार्थी महिलांनी नूतनीकरण करण्यासाठी नव्याने मिळकतीचा आणि निवास दाखला समाज कल्याण खात्याला सादर करायचा आहे. त्यासाठी हे दोन्ही दाखले मिळविण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मुरगाव मामलेदार कचेरीत महिलांची मोठी गर्दी होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करून या दाखल्यांसाठी महिला गर्दी करीत होत्या. दरदिवशी किमान पाचशेपेक्षा अधिक महिला मामलेदार कचेरीत गर्दी करीत होत्या. यामुळे मामलेदार कचेरीतील कर्मचाऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली होती. तथापि, मिळकतीचे दाखले मुरगाव पालिकेकडून दिले जाईल, असे फर्मान काढल्यावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून पालिका कार्यालयात महिलांची गर्दी उसळत आहे.

सकाळी सात वाजल्यापासून महिला या दाखल्यांसाठी पालिकेत जमा होत आहे. पण, दरदिवशी अर्जांच्या नियम अटीत बदल करण्यात येत असल्याने महिलांची क्रूर थट्टा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मिळकतीच्या दाखल्यांसाठी करण्यात येणाऱ्या अर्जासाठी दीड-दोनशे रुपये खर्च केल्यानंतर ते चुकीचे असल्याचे सांगून अर्ज नाकारले जात आहेत. परिणामी महिलांना मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

मिळकतीच्या दाखल्याच्या अर्जावर राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक केली आहे. त्यामुळे महिलांना अधिक धावपळ करावी लागत आहे. कोणीच अधिकारी स्वाक्षरी करीत नसल्याने वास्कोत महिलांना यातना सहन कराव्या लागत आहेत. नगरसेवक धनपाल स्वामी यांनी याविषयीची तक्रार नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्याकडे करून निष्पाप महिलांचा चाललेला छळ थांबविण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.

संबंधित बातम्या