ख्रिस्ती पंथगुरुंकडून गोमंतकीय भाषांचे संवर्धन

एव्होराच्या सार्वजनिक ग्रंथालयात कोकणी भाषेतील अनेक हस्तलिखिते आणि पुस्तके जतन करून ठेवली आहेत. आपल्या राजभाषेची संपत्ती असलेली ही हस्तलिखिते गोवा सरकारने गोव्यात परत आणण्याची गरज आहे.
Book
Book Dainik Gomantak

(सुशीला सावंत मेंडीस)

सोळाव्या आणि सतराव्या शतकात युरोपियन पंथप्रचारकांनी भारतात निर्माण केलेले मराठी आणि कोकणी साहित्य हा त्यांच्या पंथप्रसाराच्या कार्याचा अविभाज्य भाग होता. दुर्दैवाने यातील बहुतांश साहित्य पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या मिशनऱ्यांच्या केवळ एक किंवा दोन साहित्यकृती आज भारत किंवा युरोपमधील विविध ग्रंथालयांमध्ये हस्तलिखित स्वरूपात किंवा सतराव्या शतकात छापलेल्या आवृत्त्यांमध्ये विखुरलेल्या आढळतात.

प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध इन्क्विझिशनबद्दल लिहिणारे म्हणून अ. का. प्रियोळकर यांची ख्याती असली, तरीही स्थानिक भाषांच्या प्रचारात ख्रिश्चन जेझुइट पंथगुरूंच्या योगदानाबद्दल आतापर्यंतचा सर्वांत अभ्यासपूर्ण संशोधनात्मक लेखही त्यांनीच लिहिला आहे.

ज्यांचे ख्रिस्तीकरण करायचे आहे, त्यांच्यापर्यंत कॅथलिक शिकवण पोहोचवण्याचा हेतू या साहित्यनिर्मितीमागे असला, तरी त्यामुळे दोन्ही भाषा समृद्ध झाल्या.

१६१६साली ‘ख्रिस्तपुराण’ लिहिणाऱ्या स्टीफन थॉमस या जेझुइट याजकाचे नाव माहीत नसेल असा गोमंतकीय साहित्यप्रेमी गोव्यात शोधूनही सापडणार नाही. पर्वरी येथे जेझुइट्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोकणी केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले आहे. १५४९साली जन्मलेले स्टीफन हे एक इंग्रज होते. नव्यानेच ख्रिस्ती झालेल्यांना त्यांच्या जुन्या पुराणातील कथा विसरणे कठीण होते. पुराण कथन श्रवण यावर नंतर बंदी घालण्यात आली.

पण, ख्रिस्तीकरण झालेल्यांना त्यांच्या मूळ पुराणांपासून दूर करून ख्रिस्तभक्तीत लीन करण्यात ‘ख्रिस्तपुराणा’ची भूमिका खूप मोठी होती. जुन्या हिंदू पुराणांच्या धर्तीवर ख्रिश्चन सामग्री असलेले पुराण रचण्याचा हा प्रयत्न होता. ख्रिस्ताच्या जगासमोर येण्याच्या या प्रवचनाला एक प्रस्तावना आहे, कवीचे आवाहन, मराठी भाषेची स्तुती ज्यामध्ये कवीने मराठीतून ख्रिस्तपुराण लिहिण्याचे प्रयोजन सांगितले आहे. प्रस्तावनेत त्यामागची प्रेरणाही सांगितली आहे.

फादर स्टीफन यांच्या निधनानंतर १६२२साली ‘डॉट्रिना क्रिस्टम’ ही कोकणीतील महान रचना प्रकाशित झाली. फादर यांनी याच विषयावरील फादर मार्कोस जॉर्ज यांच्या पोर्तुगीज भाषेतील साहित्यकृतीचे भाषांतर असल्याचे दिसते. मराठी समजल्या जाणाऱ्या त्या काळातील अधिक साहित्यिक भाषेची फारशी ओळख नसलेल्या खालच्या जातीतील नवख्रिस्तींना समजण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करून घेण्याचा हेतू होता.

त्यांनी या पुस्तकाच्या भाषेचे वर्णन ‘लिंगुआ ब्रामण कॅनरिना’, असे केले आहे. गोव्यातील विविध जाती जमातींमध्ये आणि प्रदेशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या कोकणीच्या बोलीरूपामध्ये बरीच विविधता असल्याने, त्यांनी सासष्टीतील ब्राह्मणांकडून बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेला मानक म्हणून निवडले.

फादर स्टीफन यांनी गोव्यात बोलल्या जाणाऱ्या बोलीचे व्याकरणही ‘आर्टे दा लिंगोआ कॅनारिन’ नामक पुस्तकात लिहिले. १६४०साली हे पुस्तक राचोलमध्ये फादर डिओगो रिबेरो यांनी प्रकाशित केले होते. कुन्हा रिवारा यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे ख्रिश्चन झालेल्या ब्राह्मणांच्या सहवासात घालवल्यानंतर १६१९साली त्यांचा मृत्यू झाला.

फादर स्टीफन यांच्याप्रमाणेच युरोपियन वंशाचे इतर परदेशी जेझुइट ख्रिस्ती पंथगुरू भारतात आले आणि त्यांनी स्थानिक भाषा तसेच लिखित लिपी शिकण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि शेवटी मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी साहित्य लिहिले. त्यांच्या मिशनरी आवेशाने या परदेशी भाषा शिकण्याची प्रेरणा त्यांना दिली असावी.

फादर डिओगो रिबेरो, एस.जे. (१५६०-१६३३) यांनी केवळ बोली भाषेतच लिहिले. फादर रिबेरो यांनी १६३२साली ’अ स्टेटमेंट ऑफ द ख्रिश्चन डॉक्ट्रीन’ नावाचे त्यांचे पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी ‘व्होकाबुआरिओ दा लिंगुआ कॅनारिन’ हे पुस्तकदेखील लिहिले.

सरकारचे मुख्य सचिव डॉ. कुन्हा रिवारा यांनीही कोकणी भाषेवर त्यांचा सुप्रसिद्ध निबंध लिहिला असला तरी खूप अलीकडल्या काळातला आहे. ते स्वत: पोर्तुगीज असूनही त्यांनी ‘कोकणीला केवळ गोमंतकीयांची भाषा मानल्याबद्दल’ तीव्र टीका केली. रिवारा हे मूळचे एव्होराचे रहिवासी होते आणि जेव्हा मी एव्होराच्या सार्वजनिक वाचनालयात अभ्यास करायला गेले, तेव्हा मला जाणवले की या ग्रंथालयात कोकणी भाषेतील अनेक हस्तलिखिते आणि पुस्तके जतन करून ठेवली आहेत.

आपल्या राजभाषेची संपत्ती असलेली ही हस्तलिखिते गोवा सरकारने गोव्यात परत आणण्याची गरज आहे. मूळ प्रत आणणे शक्य नसल्यास किमान फोटोकॉपी तरी गोमंतकीय वाचकांसाठी उपलब्ध करून देणे खूपच गरजेचे आहे. असे दिसते की मुख्य सचिवांनी आपल्या अधिकाराचा वापर करून आपल्यासोबत महत्त्वाची हस्तलिखिते आणि पुस्तके घरी नेली होती, परंतु त्यांनी ती आपल्या गावी सार्वजनिक वाचनालयाला दान केली आहेत. पोर्तुगालमधील हे एकमेव वाचनालय आहे, जे जुन्या फॅसिमाईलची फोटोकॉपी काढण्यास परवानगी देत नाही परंतु त्याऐवजी पेनड्राइव्हमधून छायाचित्रे सुपूर्द करते.हस्तलिखितांची काळजी घेण्याचे नियम पोर्तुगालमध्ये सर्वांत जास्त कडक आहेत.

आणखी एक रेझुइट याजक फा. एींळशपपश वश श्रर उीेळु, जो ऋी नंतर आला.

राशोल जेझुइट कॉलेजचे रेक्टर म्हणून कार्यभार सांभाळणारे फादर एटिने दे ला क्रॉइक्स यांनीही कोकणी आणि मराठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. ‘फादर क्रॉइक्स स्थानिकांपेक्षा अधिक सफाईदारपणे व अचूक पद्धतीने स्थानिक भाषा बोलतात. दोन्ही भाषांमध्ये त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत ज्यांची सर्वांनी प्रशंसा केली आहे’, असे मत ऍलेक्स रोड्स यांनी नोंदवले आहे.

त्याच्या प्रमुख कार्याचा विषय म्हणजे सेंट पीटरचे जीवन. लिंगुआ ब्रामण मरस्तामधून त्यांनी लिखाणे केले आहे. त्यांनी आपल्या लेखनात हिंदू देव विष्णूची निंदा केली आहे. त्या काळातील कॅथोलिक पंथगुरूच्या मानसिकता पाहिल्यास, असे करणे वावगे वाटत नाही.

फादर आंतोनिओ दा साल्दाना एस. जे. यांनी मराठी आणि कोकणी दोन्ही भाषेत लिहिले. त्यांनी १६६५साली त्यांनी पडुआ येथील सेंट अँथनी यांच्या जीवनावर लिहिले. ‘पापाची कबुली’ नामक त्यांचे प्रवचनही आहे. स्टीफन्स आणि क्रॉईक्स यांचा वारसा आंतोनिओ यांनी पुढे चालवला, किमान राशोल पांथिक विद्यालयाचे रेक्टर म्हणून तरी निश्‍चितच!

फादर सिमाओ गोम्स यांनी अनेक वर्षे सासष्टीत पॅरिश याजक म्हणून काम केले आणि सासष्टीच्या स्थानिक भाषेवर प्रभुत्व मिळवले. इतर बहुतेक समकालीन ख्रिश्चन साहित्य रोमन लिपीत लिहिलेले असले तरी, त्यांनी देवनागरी लिपीत लिहिलेल्या पुस्तकाचे नाव ‘सर्वेश्वराचा ज्ञानोपदेश’, असे आहे.

१७०९साली त्यांनी डेसू (महाराष्ट्रातील डेक्कन प्रदेश) येथे एक ख्रिश्चन मिशन सुरू केले. यात ३६० पृष्ठे आहेत आणि ती मराठी गद्यात लिहिलेली आहेत, बहुधा महाराष्ट्रातील दख्खनमधील मराठी भाषिक लोकांसाठी. १७२२साली राशोल येथे त्यांचा मृत्यू झाला.

फादर मिंगेल द आल्मेदा एस.जे. यांनी कॅनरीन भाषेतील ‘गार्डन ऑफ शेफर्ड्स’ (जार्डिन डॉस पास्टोरेस) हे पुस्तक लिहिले, जे सुदैवाने गोव्याच्या ऐतिहासिक अभिलेखागारात उपलब्ध आहे. त्यांनी ‘प्रेषित सेंट पीटरवर प्रवचन’ही लिहिले.

फादर दिएगो रिबेरो यांनी लिहिलेल्या ‘व्होकाबुआरिओ दा लिंगुआ कॅनारिन’ या पुस्तकाचा विस्तार त्यांनी मुख्यत्वे केला. अजून एक जेझुइट, फादर. जुआंव द पेद्रोसा, एस. जे. यांनी लिंग्वा ब्रामण (त्या काळातील कोकणी भाषेचे दुसरे नाव) मध्ये लिहिले आणि १६६०साली ‘डिव्हाईन सॉलिलोकीज’ प्रकाशित केले. ते काही काळ राशोल पांथिक विद्यालयाचे रेक्टर होते. १६७२साली गोव्यात त्यांचे निधन झाले.

१७७६साली गोव्याचे मुख्य बिशप डी. फ्रान्सिस्को दा असुनकाओ यांनी बंदी घालेपर्यंत गोव्याच्या चर्चमध्ये मराठी ख्रिस्त पुराणातील उतारे वाचण्याची प्रथा होती. त्यामुळे या युरोपियन जेझुइट कॅथलिक पंथगुरूंच्या साहित्यास गोमंतकीय पारखे झाले. मराठी आणि कोकणी अकादमी या दोन्ही अकादमींनी गोव्याच्या मातृभाषांच्या विकासात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका समजून घेण्यासाठी या क्षेत्रातील सखोल संशोधनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com