राज्‍यभरात वायंगण शेतीची लगबग

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वायंगण शेतीचे वेध लागले आहेत. पिळगाव आणि मये आदी काही भागात तर वायंगण शेतीसाठी मशागतीची कामे सुरू झाली आहेत. 

डिचोली : राज्‍यासह डिचोली तालुक्‍यातील बहुतेक सर्वच भागात खरीप भातपिकाचा मोसम आटोपला आहे. आता तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वायंगण शेतीचे वेध लागले आहेत. पिळगाव आणि मये आदी काही भागात तर वायंगण शेतीसाठी मशागतीची कामे सुरू झाली आहेत. 

तालुक्‍यातील अन्य भागांच्या तुलनेत पिळगाव भागात दरवर्षी एक महिना अगोदर वायंगण शेती लागवड करण्यात येते. पिळगावात दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने या भागातील शेतकरी एक महिना अगोदरच वायंगण भातपिक घेतात. या भागातील शेतकऱ्यांनी खरीप पिक घेतले असून, सध्या बळीराजा वायंगण शेतीच्या कामाकडे वळला आहे. शेतजमीन नांगरणीचे काम सुरूही झाले आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पिळगाव भागातील शेतकरी वायंगण शेती लागवडीच्या कामाकडे वळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तर येत्या काही दिवसात अन्य भागात वायंगण शेती मशागतीच्या कामांना सुरवात होणार असल्याचे समजते. 

महिन्यापूर्वी पावसाचा जोर कमी होताच, मये भागातील शेतकऱ्यांनीही वायंगण शेतजमिनीची मशागत करण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या अनास्थेमुळे तालुक्‍यातील मोजकेच गाव वगळता मये, पिळगाव, कुडचिरे, बोर्डे, कारापूर, मेणकुरे आदी बहुतेक गावात अजूनही वायंगण शेतीचे अस्तित्व टिकून आहे. तालुक्‍यात १२० हेक्‍टरहून अधिक  शेतजमिनीत वायंगण भातशेतीची लागवड करण्यात येते. 

संबंधित बातम्या