गोव्याची सांस्कृतिक परंपरा: आराध्‍याला स्‍मरण करूनच भजनाचा प्रारंभ

सुदेश आर्लेकर
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

गोमंतकीय मराठी भजनाच्या प्रारंभी विविध देव-देवतांचे श्लोक आवर्जून गायिले जातात. महाराष्ट्रातील भजनाचा प्रारंभ बव्हंशी श्रीज्ञानेश्वरांंना वंदन करणाऱ्या ‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र।।’ संतांच्या श्लोकाने होतो; तथापि, गोमंतकीय भजनाचा प्रारंभ परंपरेनुसार श्रीगणेशावरील श्लोकाने अथवा ‘श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे...’ या श्लोकाने  होत असतो.

गोमंतकीय मराठी भजनाच्या प्रारंभी विविध देव-देवतांचे श्लोक आवर्जून गायिले जातात. महाराष्ट्रातील भजनाचा प्रारंभ बव्हंशी श्रीज्ञानेश्वरांंना वंदन करणाऱ्या ‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र।।’ संतांच्या श्लोकाने होतो; तथापि, गोमंतकीय भजनाचा प्रारंभ परंपरेनुसार श्रीगणेशावरील श्लोकाने अथवा ‘श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे...’ या श्लोकाने  होत असतो.

महाराष्ट्रीय भजनाशी तुलना करता, भजनाचा प्रारंभ गणरायाच्या आराधनेने करण्याचा गोमंतकीय भजनामध्ये प्रघात असणे हे गोमंतकीय भजनाचे एक वैशिष्ट्य आहे. श्रीगणेशावरील श्लोक व ‘श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे...’ श्लोक झाल्यानंतर मग अन्य श्लोक गायिले जातात. त्यामध्ये श्रीशिवशंकर, श्रीविष्णू, श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीमारुती, श्रीदत्तगुरू, श्रीगुरुदेव, श्रीब्रह्मदेव, श्रीसूर्यदेव, श्रीसाईबाबा, श्रीसत्यनारायण, पार्वतीदेवी / देवी, श्रीमहालक्ष्मी, श्रीशांतादुर्गा, श्रीकालिका/ श्रीमहिषासुरमर्दिनी, श्रीसरस्वती अशा दैवतांवरील श्लोकांचा समावेश होतो. श्रीवेताळ, श्रीरवळनाथ, श्रीभगवती अशा काही गोमंतकीय दैवतांचे, लोकदैवतां, स्थलदैवतांवरीलही श्लोक प्रचलित आहेत.

स्थल-कालानुसार, औचित्यानुसार तसेच वेळेच्या मर्यादेनुसार या कित्येक श्लोकांमधून निवडक श्लोक सादर करावे लागतात. असे असले तरी श्रीगणेश, श्रीशिवशंकर, देवीवरील श्लोक, तसेच गुरुस्तवन, ‘श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे...’ हे मंगलाष्टक व ‘‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र...’ हा संतांचा श्लोक सादर करणे बंधनकारक आहे.

श्रीशंकरावरील श्लोक झाल्यानंतर आवर्जून देवीवरील श्लोकही सादर करणे, ज्या ठिकाणी श्रीरामाचे मंदिर असेल त्या ठिकाणी श्रीरामावरील श्लोकाबरोबरच श्रीमारुतीवरील श्लोक, तसेच भजनाच्या उत्तरार्धात सादर होणाऱ्या गौळण गायनापूर्वी भगवान श्रीकृष्णावरील श्लोक सादर करणे अनिवार्य आहे. 

भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर भजनाचा प्रारंभ ‘श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे...’ याच श्लोकाने करायचे. त्यामुळे, त्यांचे शिष्य, तसेच मनोहरबुवांनी प्रस्थापित केलेल्या भजन परंपरेला मान देणारी कलाकार मंडळी अजूनही त्याच पद्धतीने भजनाची सुरवात करतात. आपण सर्व जण कोणतेही धार्मिक कार्य करताना सर्वप्रथम श्रीगणेशाला वंदन करीत असल्याने भजनाची सुरवात श्रीगणेशावरील श्लोकाने करावी असा अन्य एक मतप्रवाह गोव्यात आहे.  परंतु, गोमंतकीय भजन हे बव्हंशी वारकरी संप्रदायाशी निगडित असल्याने वारकरी संप्रदायातील दैवताची आराधना सर्वप्रथम करणे यात काहीच गैर नाही. त्याबाबत कुणावर सक्तीही करता येत नाही; कारण, सर्व दैवते एकसमान आहेत, अशी आम्हा सर्वांची भावना आहे.

।। श्रीशिवस्तुति ।।
(शिवशंकराची प्रार्थना) : कैलासराणा शिवचंद्रमौळी। फणींद्र माथां मुकुटीं झळाळी।। कारुण्यसिंधू भवदु:खहारी। (कारुण्यसिंधू तू दु:खहारी।) तुजवीण शंभो मज कोण तारी।।
(शिवशंकराची प्रार्थना) : नमोदेवा महादेवा आदिदेवा सदाशिवा। अव्यक्ता अजिताईशा पार्वतीशा नमो नम:।।

।। श्रीगणेश प्रार्थना ।।
प्रारंबी विनंती करूं गणपती। विद्यादयासागरा।। अज्ञानत्व हरोनि बुद्धि मति दे। आराध्य मोरेश्वरा।।
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।। नमो शारदा मूळ चत्वरिवचन। (नमूं शारदा मूळ चत्वारी/चत्वर वाचा) गमो पंथ आनंत या राघवाचा।।
(प्रात:स्मरण / वक्रतुण्डस्तोत्र) : वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।। गणनाथ-सरस्वती-रवि-शुक्र-बृहस्पतीन्‍। पंत्र्चैतान्‍ संस्मरेनित्यं वेदवाणी प्रवृत्तये।।

।। श्रीदेवीमाहात्म्य ।।
नमोऽस्तुते महामाये। श्रीपीठे सुरपुजिते।। शंखचक्रगदाहस्ते। श्रीनारायणी नमोऽस्तुते।।

।। श्रीसरस्वतीस्तवन ।।
(मंगलाष्टक) : या कुंन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता। या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।। या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्दैवै: सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा।।

।। श्रीमहालक्ष्मी स्तोत्र ।।
नमोऽस्तुते महामाये। श्रीपीठे सुरपूजिते।। शंखचक्रगदाहस्ते। महालक्ष्मी नमोऽस्तुते।।

।। देवीवंदना ।।
या देवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम:।।१।। या देवी सर्वभूतेषू शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम:।।२।। या देवी सर्वभूतेषू देवीरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम:।।३।। सर्व मंगले मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।४।। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम:। नम: प्रकृत्यै भद्रायै नियत: प्रणत: स्मताम्‍।।५।।

।। श्रीविष्णुवंदना ।।
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्‍। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्‍गम्‍।। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यागनम्यम्‍। वन्दे विष्णुं भवभवहरं सर्वलोकैकनाथम्‍।।

।। मंगलाष्टक ।।
श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा। गोविंदा गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा।। श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते। वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि माम्‍।।

।। श्रीकृष्ण वंदना ।।
मुकं करोति वाचालं। पंगुं लंघयते गिरिम्‍।। यत्कृपा तंमहं वंदे। परमानंदं माधवम्‍।।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम:।। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्‍ देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्‍गुरुम्‍।।
गोविंद गोविंद हरे मुरारे। गोविंद गोविंद रथांगपाणे। गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण। गोविंद गोविंद नमो नमस्ते।।

।। श्रीपांडुरंगाचा श्लोक ।।
महायोगपीठे तटे भीमरथ्या। वरम्‍ पुंडलिकाय दातूं मुनिंद्रेय। समागत्यतिष्ठं तमानंदकंदम्‍। परब्रह्मलिंगम्‍ भजे पांडुरंगम्‍।।

।। संतांचा श्लोक ।।
(ज्ञानदेवांचा श्लोक) : अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी।।

।। श्रीसद्‍गुरुस्तवन ।।
(गुरुवंदना/ गुरुस्तुती) : ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम्‍। द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्‍।। एकं नित्यं विमलमचलं अर्वधी: साक्षिभूतम्‍। भावातीतं त्रिगुणरहितं सद्‍गुरुम्‍ तं नमामि।। (श्री गुरुदेव दत्त।)

।। गुरुस्तुती ।।
ज्या ज्या ठिकाणीं (स्थळीं) मन जाय माझें। त्या त्या ठिकाणीं (स्थळीं) निजरूप तुझें। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणीं। तेथें तुझे सद्‍गुरू पाय दोन्ही।। (जय जय रघुवीर समर्थ।)

।। श्रीसद्‍गुरु ।।
गुरु थोर म्हणावा कीं देव थोर म्हणावा। आधीं नमस्कार कोणासी करावा।। मनीं भावें तो सद्‍गुरू थोर आहे। तयांचे प्रसंगी रघुराज पाहे।।

।। श्रीदत्तात्रेयस्तोत्र ।।
जटाधरं पाण्डुरङ्‍गं शूलहस्तं कृपानिधिम्‍। सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे।।

।। श्रीदत्तात्रेयस्तोत्र ।।
सदा प्रार्थितों स्वामी तुझ्या पदासी। नमोनी तुला वर्णितो आदरेसी।। धरोनी करीं तारी या बालकासी। नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयासी।।

।। श्रीरामवंदना ।।
मातारामो मत्‍पिता रामचंद्र:। स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:। सर्वस्वंमेरामचंद्रोदयाळू:। नान्यंजानेनैवजाने न जाने।।

।। श्रीरामवंदना ।।
सदा सर्वदा योग तुझा घडावा। तुझे कारणीं देह माझा पडावा।। उपेक्षू नको गुणवंता अनंता। रघुनायका मागणें हेचि आतां।।

।। श्रीमारुतिस्तोत्र ।।
भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती। वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना।।

।। श्रीमारुतीस्तुती ।।
मनोजवं मारुततुल्यवेगं। जितेंन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‍।। वातात्मजं वानरयूथमुख्यं। श्रीरामदूतं बुद्धिमतां वरिष्ठम्‍।। (वातात्मजं वानरयूथमुख्यं। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।।)

।। श्रीसूर्यस्तुती ।।
जयाच्या रथा एकची चक्र पाहीं। नसे भूमिआकाश आधार कांही।। असे सारथी पांगुळा ज्या रथासी। नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।

संबंधित बातम्या