कुडचडे मासळी मार्केटचे लोकार्पण

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

नूतनीकरण करण्यात आलेल्या कुडचडे नागपालिकेच्या जुन्या मासळी मार्केटचे आज (सोमवारी) वीजमंत्री निलेश काब्राल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, पालिकाधिकारी अजय गावडे व इतर नगरसेवक उपस्थित होते.

कुडचडे :  नूतनीकरण करण्यात आलेल्या कुडचडे नागपालिकेच्या जुन्या मासळी मार्केटचे आज (सोमवारी) वीजमंत्री निलेश काब्राल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, पालिकाधिकारी अजय गावडे व इतर नगरसेवक उपस्थित होते. 
वीजमंत्री काब्राल म्हणाले, कित्येक वर्षांचे जुने मासळी मार्केट तसेच होते. त्याचे नूतनीकरण कोणी केले नाही. मात्र, आता पालिका मंडळाने चांगल्या रीतीने नूतनीकरण केले आहे. उघड्यावर मासळी विक्री करणाऱ्यांना मासळी मार्केटमध्ये पालिकेने सामाहून घ्यावे. ‘कोविड’ परिस्थितीमुळे मिळेल तिथे मासळी विक्री केली जाते ती आता बंद करणे आवश्यक आहे. यानंतर मासळी मार्केट आणि चिकन मटण मार्केट काडा हॉलच्या मागे स्थलांतर करण्याचा निर्णय पालिका मंडळाने घेतला असल्याने त्या ठिकाणी पार्किंगची सोय चांगली होणार आहे. 

गोव्यात कोळसा विषय गाजत असून, यावर मंत्री काब्राल म्हणाले, १९४७ सालापासून गोव्यात कोळसा एमपीटीसाठी येत आहे. तेथून तो मग पुढे जातो. यावर आता जो विचार करून काही राजकारणी आणी एनजीओ सहभागी झाले आहेत ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. गोव्यात ‘कोळसा हब’ होऊ देणार नाही. रेल्वे डब्बल ट्रॅक काम करीत आहे, ती देशाची योजना त्यात बदल केला जाणार नाही. गोव्यात ‘कोळसा हब’ किंवा कोळसा जळण करण्यासाठी आपलाही विरोध आहे. डबल ट्रेक बंद करून कोळसा नको म्हणण्यापेक्षा तो अन्य मार्गाने बंद करूया. पण, राजकारण करून डबल ट्रॅक बंद करणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, कुडचडे येथील कामराळ, शिरफोड व शेळवण येथील प्रश्न सोडविण्यासाठी मंजूर करून घेतला आहे. त्याचबरोबर ‘सागरमाला’चा वापर पॅसेंजरवाहू बोटीसाठी केला जाणार आहे. ठीक-ठिकाणी जेटी या पॅसेंजर चड उतार करण्यासाठी बांधल्या जाणार आहेत. त्या कोळसा वाहतुकीसाठी नाहीत, असेही ते म्हणाले. आपण कोणत्याही चर्चेसाठी तयार असून, हजार समर्थक घेऊन चर्चा करण्यापेक्षा योग्य माध्यमातून करूया असे आवाहन 
केले. 

नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर म्हणाले, खूप वर्षांचा प्रश्न आज आमदारांनी सहकार्य केल्यामुळे पालिकाधिकारी आणि पालिका अभियंता यांच्या पुढाकाराने पालिका मंडळाने हा प्रश्न सोडविला आहे. मासळी विक्रेत्यांनी मार्केटमध्ये स्वच्छता ठेवून लोकांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहन केले. 
यावेळी मासळी विक्रेत्यांनी मंत्री काब्राल समोर समस्या मांडताना रस्त्यावर व वाहनातून केली जाणारी मासळी विक्री बंद करून सर्वांना एकत्र बसविण्याची मागणी केली असता पालिका प्रशासन यात लक्ष घालून प्रश्न मिटविणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या