म्हापशात पुन्हा भाजपविरोधात भाजप

म्हापशात भाजपविरोधात भाजप, अशी राजकीय परिस्थिती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून निर्माण झाली आहे. ∙∙∙
BJP
BJPDainik Gomantak

म्हापशात पुन्हा भाजपविरोधात भाजप

अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून म्हापशातील एकतानगरात रातोरात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. यासंदर्भातील मजेशीर गोष्ट म्हणजे, तो पुतळा उभारण्यात प्रामुख्याने भाजप समर्थकांचाच हात आहे. परंतु, पुतळा उभारण्यात पुढाकार घेणारी ती सर्व मंडळी खुद्द भाजपचेच स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांच्या विरोधात आहे. जोशुआ डिसोझा यांनीदेखील त्या पुतळ्याच्या विरोधात आक्रमकता दर्शवून तो पुतळा हटवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचेही ऐकिवात आहे. एवढे मात्र खरे, की म्हापशात भाजपविरोधात भाजप, अशी राजकीय परिस्थिती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून निर्माण झाली आहे. ∙∙∙

...ते भाजपवाले कुठे आहेत?

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर मडगावात आपला उमेदवार घोषित करण्यास भाजपने विलंब केला होता. मात्र, नंतर एका नावाची घोषणा केली गेली आणि त्यानंतर एकच काहूर माजले. त्या उमेदवाराने लगेच दणक्यात कार्यालय देखील सुरू केले आणि आगीत आणखी तेल ओतले गेले.मात्र, भाजपमध्ये स्वतःला ज्येष्ठ नेते म्हणविणाऱ्याने या उमेदवाराविरुध्द जाहीरपणे पंगा घेतला. त्यातून त्या उमेदवारानेच रिंगणातून माघार घेतली. नंतर नवा उमेदवार जाहीर झाला; पण त्याच्या प्रचारातसुध्दा हे ज्येष्ठ नेते काही कुठे झळकले नाहीत. त्यांनी पक्षाविरुध्द घेतलेल्या भूमिकेबद्दल कारवाईची घोषणा झालेली नसल्याने हे नेते सध्या नेमके कुठे आहेत, असा प्रश्न भाजपवाल्यांनाच पडला आहे. ∙∙∙

झोपी गेलेले जागे झाले

कुणाचीही परवानगी न घेता वीज खात्याने मडगावच्या लोहिया मैदानावर ट्रान्सफार्मर उभा केला, ज्याचा या मैदानाशी काडीचाही संबंध नाही. आता या मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेताना या ट्रान्सफार्मरसमोर भिंत उभारल्याने हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. वास्तविक हा ट्रान्सफार्मर बसवून बरीच वर्षे झाली; पण त्यावेळी त्याकडे लक्ष देण्यास कुणाला फुरसत नसावी. या मैदानाची देखभाल करणाऱ्या १८ जून क्रांती समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर हे त्यावेळी स्वतः नगरसेवक होते; पण त्यांनीही त्यावेळी काही आवाज काढल्याचे ऐकिवात आलेले नाही. या मैदानावर हा ट्रान्सफार्मर आणण्यासाठी कोणाचा हात आहे, याची चौकशी केली असता वीज खात्यात असलेल्या लोलये येथील एका अभियंत्याचेच हे कर्म असे सांगण्यात आले. यामागे नक्की काही तरी गोलमाल नाही ना? ∙∙∙

गुपचूप-गुपचूप

आमसभेची मान्यता न घेता गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीला एक वर्षाची वाढीव मुदत कशी दिली, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी आम्ही याच कॉलममध्ये लिहिले होते. त्याचवेळी या संघटनेची यावेळी होणारी निवडणूक त्यामुळे चुरशीची होणार, याचे संकेतही दिले होते. मात्र, आता समजते की विरोधी गटाला गाफिल ठेवून या संघटनेच्या कार्यकारिणीने निवडणुकीसाठीची प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारी अर्जही भरून घेतले आहेत. ही सर्व प्रक्रिया अगदी गुपचूप केल्याचा विरोधी गटाचा आरोप आहे. त्यामुळे आता हे निवडणूक प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊ शकते, असे सांगितले जाते. म्हणजे सध्या वाढलेल्या तापमानात आणखी वाढ होणार, हे नक्की. ∙∙∙

‘लेट लतीफ’ भरारी पथक

बेकायदा डोंगर कापणी, जमीन सपाटीकरणाची कामे राज्यात बिनधास्त चाललेली असतात. ही कामे कुणाच्या संगनमताने चाललेली असतात, ते सुज्ञास अधिक सांगणे न लगे. पण काही समाजकार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्त्यांमुळे अशा बेकायदा कृत्यांना चाप लागण्यास सुरवात झाली आहे. शेत राखणारे कुंपणच जर शेत खाऊ लागले तर मग जायचे कुणाकडे हा प्रश्‍न असतो, तसाच हा सरकारी यंत्रणेचा प्रकार असतो. पण या सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्त्यांमुळे प्रशासनाला काहीशी जरब बसली आहे. तरीही काही फ्लाईंग स्क्वॉडवाल्यांचे नखरे पाहिले तर यांना कडक समज द्यायला हवी, असे वाटते. आता कुर्टीतीलच बघा, एका डोंगर कापणीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याने भरारी पथकाला फोन केला, तर हे लोक उशिरा तर आलेच आणि आल्या आल्या तेथील जेसीबी यंत्रासह चालकाला जाऊ देण्यास मदतच केली. मात्र, आरटीआय कार्यकर्त्यांनी या प्रकाराचीही तक्रार केली आहे. असे प्रकार जर होऊ लागले तर सरकारी प्रशासन काय कामाचे, असा सवाल उपस्थित होणे क्रमप्राप्त आहे. ∙∙∙

(Current status of BJP in Goa)

BJP
राणेंची कुऱ्हाड, सावंतांची तलवार

छोटे खाशे आक्रमक

भाजपने यंदाची निवडणूक मुख्यमंंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविली होती, तरी नंतर म्हणजे पक्षाला बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री पदासाठी ‘छोटे खाशे’ अर्थात विश्वजीत राणे यांनी जोरदार दावा केला होता. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊनही प्रयत्न केले; पण त्यात त्यांना यश आले नाही. जरी ते मुख्यमंत्री होऊ शकले नसले तरी त्यांना वजनदार खाती मिळाली व त्या खात्यांना सक्रिय करून ते आपली छाप पाडताना दिसत आहेत. गोवा मंत्रिमंडळात आपण तेवढे कार्यक्षम, असे दाखविण्याचा तर हा प्रयत्न नसावा ना, असे भाजपमधील त्यांच्या विरोधकांना वाटू लागले आहे. परंतु सत्य आहेच, की ते धडाडीने कामाला लागले आहेत! ∙∙∙

....दुबळी माझी झोळी

‘आयआयटी’साठी सभापती रमेश तवडकर यांनी कंबर कसली आहे. यापूर्वी एकदा या प्रतिष्ठेच्या शिक्षण संस्थेसाठी काणकोणच्या लोलयेतील भगवती पठारावरील जागेची निवड झाली होती; पण दिशाभूल झालेल्या वा करून दिलेल्या लोकांच्या विरोधामुळे सरकारने विचार बदलून ती सांगेला नेली होती. पण शिक्षण क्षेत्राशी निकट संबंध असलेल्या तवडकरांनी यावेळी निवडणूक जिंकल्यावर व सत्तेत आल्यावर पुन्हा ‘आयआयटी’साठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही येत आहे. त्यांनी लोलये नव्हे, तर शेजारच्या पैंगीण पंचायतीतील कुळटी पठारावर ती उभारण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे लोलयेतील लोकांची गत ‘देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ अशी झाली आहे. ∙∙∙

गोव्याच्या ‘पीच’वर कीर्ती

१९८३ मधील विश्वचषक क्रिकेट संघाचा सदस्य असलेला कीर्ती आझाद आता गोव्याच्या राजकीय पीचवर उतरणार आहे. आझाद यांच्याकडे तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तृणमूलने यापूर्वीसुद्धा आपल्या ‘संघात’ बरेच खेळाडू ओढले आहेत. मात्र, त्यांची कामगिरी तृणमूल संघाला विजय मिळवून देणारी ठरली नाही. लिएंडर पेससारखा दिग्गज खेळाडूही गोव्याच्या पीचवर टिकला नाही. आपल्याला लोक स्वीकारणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर पेसने ‘मैदान’ सोडले. विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने गोव्यात जो गाजावाजा केला होता, तोच त्यांना महागडा पडला अशी वदंता आहे. भाजपने ‘सौ सुनारकी एक लुहारकी’ म्हणत तृणमूलची दांडी गुल केली. असे असले तरी तृणमूलने गोव्यात पाय पक्के करायचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांनी आता हालचाली सुरू केलेल्या दिसतात. त्याचाच भाग म्हणून खासदार महुआ मोईत्रा यांना हटवून कीर्तींकडे ‘गोवा’ सोपविण्यात आला आहे. आता कीर्तींना गोव्याच्या राजकीय खेळपट्टीचा कितपत अंदाज येतोय, हेही पुढे कळेलच... ∙∙∙

आता गोंधळ पंचायत निवडणुकीचा

राज्यातील पंचायत निवडणुकीचा कार्यकाळ येत्या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे पंचायतीच्या निवडणुका ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घेणार असल्याचे खुद्द पंचायत मंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, या पंचायत निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार की पूर्वीच्याच रचनेनुसार हे काही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांचे कार्यकर्ते तर या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार न होता, पूर्वीच्याच रचनेनुसार होणार असे खासगीत सांगत आहेत. एका परीने आपापल्या समर्थकांना ते याची जाणीव करून देत आहेत. सरकार पातळीवर सगळाच सावळागोंधळ आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकांसंबंधीचे खरे खोटे काय ते पंचायत मंत्र्यांनाच माहीत. ∙∙∙

त्यांची बसली पाचावर धारण

नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या आदेशानंतर खात्याने विविध भागांतील बेकायदा प्रकारांविरुध्द धडक मोहीम हातात घेतल्यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून असे प्रकार करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. खरे तर नगरनियोजन खाते हेच मुळी गैरप्रकारांचे आगर, अशी सर्वांची धारणा व गेल्या अनेक वर्षांचा या खात्याचा कारभार त्याच धर्तीवर चाललेला. त्यामुळे नियम डावलून झालेले जमीन रूपांतर विभागणीसारखे प्रकार उघडकीस येतील, याची भीती या लोकांमध्ये पसरली आहे. ∙∙∙

BJP
दिव्यांगांना सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देणार: सुभाष फळदेसाई

फुटबॉलला फिक्सिंगची कीड

गोव्यातील फुटबॉल खेळ सध्या विस्कळित झालेला आहे. त्याला गोवा फुटबॉल असोसिएशनचा निद्रिस्त कारभार कारणीभूत असल्याचे मानले जाते. कोविडचे कारण देत संघटनेचे आमदार चर्चिल आलेमाव हे चालढकल करताना दिसत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत २०२० पासून गोव्यातील फुटबॉलला मॅच फिक्सिंगच्या किडीने पोखरले आहे. आता कुठे चर्चिल आणि संघटनेला खडबडून जाग आली आहे किंवा तसे ते भासवत आहेत. कथित मॅच फिक्सिंग प्रकरण राज्याच्या क्राईम ब्रँचकडे सोपविण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यापूर्वी फिक्सिंग प्रकरणी चौकशीसाठी नैतिकता समिती नियुक्ती केली होती; पण या समितीने किती चौकशी केली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. ∙∙∙

उणी-दुणी काढण्यापेक्षा रोजगार द्या!

नवे सरकार स्थापन होऊन शंभर दिवस होण्याआधीच काँग्रेस भाजपवाल्यांची, तर भाजप काँग्रेसवाल्यांची उणी-दुणी काढून एकमेकांवर वरचढ होण्यासाठी लुटुपुटुची लढाई करू लागले आहेत. वास्तविक विश्‍वजीत राणे आणि मायकल लोबो यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी जनतेला रोजगार मिळवून दिला असता तर मेटाकुटीला आलेली जनता किमान आशीर्वाद तरी देईल. का कोणास ठाऊक, पण पूर्वाश्रमीच्या जिगरी दोस्तांमध्ये आता अचानक दरी निर्माण होऊ लागली आहे. एक तर लोबोंना जेरीस आणून पुन्हा भाजपमध्ये आणण्याचा हा प्रयत्न असावा किंवा लोबोंवर कारवाई करून वरिष्ठ मंडळींकडून शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न तर नसेल ना? अशा अनेक शंका लोक व्यक्त करत आहेत. ∙∙∙

नगरसेवक निघाले शिर्डीला!

मडगाव पालिकेत वेगवेगळ्या कारणांवरून वतावरण तापलेले असतानाच मडगावातील काही नगरसेवकांनी चक्क शिर्डीला जाण्याचा बेत आखला आहे. आता नगरसेवकांनी शिर्डीला जाण्यात काही गैर नाही. मात्र, पालिकेत वातावरण तापलेले असताना ते शिर्डीला जात असल्याने कित्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातल्या त्यात कुणा काका नगरसेवकाने ही टूर स्पॉन्सर केल्याची वदंता बाहेर फुटल्याने या शिर्डी वारीला वेगळाच वास येऊ लागला आहे बुवा!∙∙∙

मुख्यमंत्री, आमदारांचे मौन

सत्तेवर आल्यानंतर प्रथमच राज्य भाजपने सहप्रभारी सी.टी. रवी यांना बोलावून नाराज आमदार आणि मंत्र्यांच्या नाकदुऱ्या काढण्याचा प्रयत्न केला. राजधानी पणजीत बुधवारी सकाळपासूनच आमदार, मंत्री आणि पक्षाच्या सुकाणू समितीच्या बैठकीचे सत्र सुरू होते. यावेळी प्रथमच मंत्री आणि आमदारांनी कमालीचे मौन बाळगलेले दिसत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही तब्बल तीनवेळा पत्रकारांना येनकेन प्रकारेण टाळले. एरवी पत्रकार दिसताच बोलणारे मंत्री आणि आमदारही यावेळी चिडीचूप होते. यासाठी पक्षाने त्यांना तंबी दिली, की अन्य काही कारण आहे, हे मात्र समजू शकले नाही. ∙∙∙

मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड

भाजपचे सहप्रभारी सी.टी. रवी यांनी आज मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड बनविले जाईल, असे जाहीर केले. रवी यांनी असे सांगण्यामागे बरेच काही आहे. यंदा मंत्रिपदासाठी बरीच साठमारी झाली. जो तो मंत्रिपदासाठी आसुसलेला होता. पण आता जे मंत्री कार्यक्षमपणे मंत्रिपदाला न्याय देऊ शकणार नाहीत, त्यांना बदलण्याचे हे संकेत आहेत. याशिवाय नाराजांसाठी मंत्रिपदाचे ते गाजर आहे. हे करताना ते सरकारचेही रिपोर्ट कार्ड बनवणार असल्याचे सहज म्हणाले. त्यामुळे विश्‍वजीत राणे यांनाही त्यांनी गाजराची पुंगी दाखवल्याची वदंता आहे. प्रत्यक्षात पाहावे लागेल, की हे कार्ड कधी बनणार आणि त्याची अंमलबजावणी कधी होणार? की नुसतीच पक्षाचे महत्त्व वाढवण्याची ही टूम ठरणार? ∙∙∙

आमदार, मंत्र्यांना प्रशिक्षण

यंदा विधानसभेत प्रथमच काही आमदार निवडून आले आहेत, तर काहींना नव्याने मंत्रिपदाचा ताबा मिळाला आहे. शिस्तप्रिय पक्ष, अशी भाजपची ओळख आहे. या ओळखीला साजेशे काम करण्यासाठी भाजप नेहमीच आग्रही असतो. पदे लहान-मोठी असली, तरी पक्षात सर्वजण कार्यकर्ते म्हणूनच वावरतात. या सर्वांसाठी या महिन्याभरात पुण्याच्या रामभाऊ म्हाळगी संस्थेच्या वतीने समाजाभिमुख कार्याचे धडे देण्यात येणार आहेत. ही संस्था संघ परिवाराची आहे. पक्षीय शिस्तीचे धडे येथे अत्यंत कार्यक्षम पद्धतीने दिले जातात. अर्थात, संघाची शिकवण देण्यातही ते मागे-पुढे पाहात नाहीत. आता या सक्रिय संस्थेकडून राज्यातील आमदार आणि मंत्री नक्की कोणते प्रशिक्षण घेणार, हे येणारा काळच सांगेल. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com