मुख्यमंत्र्यांना धमकावणाऱ्यांना सायबर सेल काढणार शोधून

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

  मुख्यमंत्र्यांसह इतरांना आलेल्या धमकी व खंडणीसंदर्भातील संदेशाबाबतच्या तपासासाठी पोलिसांनी सायबर कक्षाची मदत घेतली आहे. मंत्री माविन गुदिन्हो यांना धमकी व खंडणीप्रकरणी केलेल्या संदेशप्रकरणी अटक केलेल्या जयेश फडते याची चौकशी करण्यात आली.

पणजी :  मुख्यमंत्र्यांसह इतरांना आलेल्या धमकी व खंडणीसंदर्भातील संदेशाबाबतच्या तपासासाठी पोलिसांनी सायबर कक्षाची मदत घेतली आहे. मंत्री माविन गुदिन्हो यांना धमकी व खंडणीप्रकरणी केलेल्या संदेशप्रकरणी अटक केलेल्या जयेश फडते याची चौकशी करण्यात आली. मात्र, त्याचा इतर प्रकरणांशी संबंध नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणांच्या चौकशासाठी काही सायबर तज्ज्ञांचाही सल्ला पोलिसांनी घेण्याचे ठरविले आहे. 

संशयित जयेश फडते याने मंत्री माविन गुदिन्हो यांना पाठविलेल्या संदेशात तसेच मुख्यमंत्र्यांसह इतरांना आलेल्या धमकी व खंडणी मागणीच्या संदेशाबाबत साम्य असल्याने त्याचा संशय बळावला होता. त्यामुळे त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता व त्याच्या मोबाईलवरून माहिती जमा करून तपास केला असता त्याचा या प्रकरणांशी काहीच संबंध नसल्याचे आढळून आले. जे संदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत तसेच इतर एका भाजप कार्यकर्त्याला आले आहेत त्यात असलेली व्यक्ती एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धमक्या तसेच खंडणीची मागणी करणाऱ्या ज्या तक्रारी पोलिसात नोंद झाल्या आहेत त्यामध्ये संदेश पाठविणाऱ्याच्या मोबाईल क्रमांक
भारतात नोंद झालेला नाही. देशाबाहेरून हा संदेश आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या क्रमांकाशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद आहे. त्यामुळे या क्रमांकाची माहिती जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याने हे संदेश पाठविले आहेत त्यामध्ये धमकी देण्याबरोबरच ५० लाखांची खंडणीची मागणी केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार ज्यांना धमकीचे व खंडणीसंदर्भात संदेश आले आहेत व तक्रार नोंदविण्यात आल्या आहेत त्यांना यापूर्वीही अशा प्रकारच्या संदेश येत होते मात्र कोणी त्याची गंभीर दखल घेण्यात आली नव्हती. मात्र सध्या राज्यात आंदोलने सुरू आहेत व त्याची माहिती फेसबुकवरून जगभरात प्रसिद्ध होत आहे. काही गोमंतकिय देशाबाहेर आहेत व संतप्त नागरिकांकडून अशा प्रकारचे संदेश पाठविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या