पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर सिलिंडरचा स्फोट; लाखोंचं नुकसान

पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर सिलिंडरचा स्फोट; लाखोंचं नुकसान
Cylinder explosion at Palole Beach in Goa

आगोंद : पाळोळे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका रेस्टॉरंटच्या स्टोअर रूममधील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या आग दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काल रात्री उशिरापर्यंत काणकोण अग्निशमन दल व मडगाव अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पाळोळे येथे असलेल्या वॉल्टर याच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सच्या स्टोअर रूममधील गॅस सिलिंडरचा काल संध्याकाळी 7:45 च्या दरम्यान स्फोट झाला असल्याची सूचना अग्निशमन दलाच्या केंद्राला प्राप्त झाल्यानंतर त्वरित दलाच्या जवानांनी पाळोळे येथे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी स्थानिकाकडून भरपूर मदत करण्यात आली. मात्र बाजूला असलेल्या चार-पाच घरातील जळाऊ लाकूड व अन्य सामान ठेवलेल्या झोपडीने पेट घेतला.आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनल्याने मडगाव अग्निशमन दलाच्या केंद्रातील जवानांना पाचारण करण्यात आले. तदनंतर साडे नऊच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविल्याचे एका प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.

स्थानिक आमदार इजीदोर फर्नांडिस, माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी, सायमन रिबेलो व अन्य नागरिक यांनी सूचना मिळता त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.अग्निशामन दलाचे निरीक्षक रवींद्रनाथ पेडणेकर अशोककुमार परीट, संजय जाधव, चंद्रहास पागी, दर्शन देसाई या दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोलाची कामगिरी बजावली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com