कोलवाळ कारागृहात अधिकाऱ्यांची ‘दबंगगिरी’ 

विलास महाडिक
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

पेडणेकर यांनी इतर दहा - बारा तुरुंगरक्षकांच्या मदतीने त्याला खोलीतून बाहेर काढताना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत भगत याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. ही मारहाण करणाऱ्यांमध्ये भोमा पावणे, तुळशीदास सावंत, नितेंद्र सतरकर याचा समावेश होता असे तक्रारीत भगत याने म्हटले आहे.

पणजी

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कारागृहात 
तुरुंग अधिकाऱ्यांची ‘दबंगगिरी’ सुरू असून कैद्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यास दिल्या जात नाही. हल्लीच विकट भगत या कैद्यासह इतरांनी मारहाणीप्रकरणी तुरुंग सहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 
सध्या सोशल मीडियावर कारागृहात काही कैदी दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. हा व्हिडिओ जरी जुना असला तरी तो मोबाईलवर चित्रित करण्यात आल्याने या कारागृहाची सुरक्षा वेशीवर टांगली गेल्याचे स्पष्ट होत आहे. तेथील काही तुरुंग अधिकारी व तुरुंगरक्षकांचाही या कैद्यांना पाठबळ आहे. त्यामुळेच ते मोकाटपणे कारागृहात दबंगगिरी करत फिरताना दिसत आहेत. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर दोनवेळा तपासणी केली जाते तर कैद्यापर्यंत हे मोबाईल पोहचतात यावरून तुरुंग कर्मचारी व कैद्यांचे लागेबांधे असल्याचे उघड होत आहे. माजी तुरुंग महानिरीक्षक हेमंत कुमार यांनी कारागृहात अचानक भेट देऊन केलेल्या तपासणीवेळी 
५० हून अधिक मोबाईल सापडले होते, मात्र मोबाईल कारागृहात पोहोचण्याचे प्रकार अजूनही बंद झालेले नाही. अनेकदा कैद्यांकडून जप्त केलेल्या मोबाईलची माहिती कारागृहातील जेलर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत देत नाहीत. हे मोबाईल परस्पर गायब केले जातात. कारण, त्यावर दावा कोणीही करू शकत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
अमलीपदार्थप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या विकट भगत याने त्याची रवानगी कच्चे कैदी असलेल्या खोलीमध्ये करावी, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती. मात्र, त्यातील कैद्यांकडून जिवाला धोका असल्याचे कळल्यावर त्याला आहे त्या ठिकाणीच ठेवण्यात यावे, अशी विनंती तुरुंग सहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर यांच्याकडे त्याने केली. मात्र, पेडणेकर यांनी इतर दहा - बारा तुरुंगरक्षकांच्या मदतीने त्याला खोलीतून बाहेर काढताना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत भगत याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. ही मारहाण करणाऱ्यांमध्ये भोमा पावणे, तुळशीदास सावंत, नितेंद्र सतरकर याचा समावेश होता असे तक्रारीत भगत याने म्हटले आहे. ही घटना पाहणाऱ्या इतर चार कैद्यांनीही अशीच तक्रार केली आहे. या दोन्ही तक्रारींमध्ये मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार कारागृहात असलेल्या सीसी टीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कॅमेरामध्ये त्याची तपासणी करावी, अशी विनंती तक्रारदारने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारागृहातील अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील काही तुरुंगरक्षकांना प्रवेशद्वारावरील ड्युटी देत नाहीत व त्यांना इतर कामे दिली जातात. या तुरुंगरक्षकांना अधिकाऱ्याचा पाठिंबा असल्याने प्रवेशद्वारावर त्यांची तपासणी केली जात नाही. ते सर्रासपणे मोबाईल घेऊन कारागृहात फिरतात व तसेच कैद्यापर्यंतही ते मोबाईल पुरवितात, अशी माहिती एका तुरुंगरक्षकानेच दिली. दोन दिवसांपूर्वी पणजीतील तुरुंग कार्यालयातील एका अधिकाऱ्याने कारागृहाला भेट दिली असता एक तुरुंगरक्षक मद्यावस्थेत आढळून आला होता. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी इस्पितळात पाठवण्यात आला असता त्याने घरी पळ काढला होता. कारागृहातील तुरुंगरक्षकांवर तेथील अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने सुरक्षाव्यवस्था डळमळीत झाली आहे.  

 

 

संबंधित बातम्या