पर्यटकांना आवरेना गोव्याचा मोह; ‘दाबोळी’त सरासरी सतरा हजार प्रवाशांची वर्दळ

पर्यटकांना आवरेना गोव्याचा मोह; ‘दाबोळी’त सरासरी सतरा हजार प्रवाशांची वर्दळ
Dabolim Airport in Goa is crowded with an average of 17000 passengers

दाबोळी: कोविड महामारी व टाळेबंदीत गेल्या वर्षभरात मुंबई विमानतळानंतर दाबोळी विमानतळावर सर्वांत अधिक प्रवाशी व विमाने हाताळण्यात आली. टाळेबंदीच्‍या काळात इतर विमानतळांवरील विमानसेवा बंद असतानाही दाबोळी विमानतळावरील विमानवाहतूक चालूच होती. सध्या दिवसाकाठी सरासरी सोळा ते सतरा हजार प्रवाशांची ये-जा चालू आहे. शनिवारी व रविवारी ही संख्या 24 हजारांपेक्षा अधिक असते, असे दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी सांगितले. दरम्यान एअर बबल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मंजुरी मिळाल्यावर ब्रिटनला एअर इंडियाची उड्डाणे चार एप्रिलपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिदिन सोळा एअरक्रॉफ्‍ट दाखल

दाबोळी विमानतळावर पूर्वी जेवढे प्रवाशी येत होते, त्याच्या आसपास प्रवाशी कोविड महामारी व टाळेबंदीनंतर प्रवासी येऊ लागले आहेत. पूर्वी दाबोळी विमानतळावर एअरक्रॉफ्ट 320 येत होते. आता एअरक्रॉफ्ट 321 येत आहेत. या विमानांची प्रवाशी क्षमता अधिक आहे. प्रत्येक विमानातून साठ प्रवाशी अधिक येऊ शकतात. सध्या दिवसाकाठी सुमारे सोळा एअरक्रॉफ्ट 321 येतात. दाबोळी विमानतळावर येणारया विमानांची संख्या जर कमी वाटत असली तरी प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पश्र्चिम प्रदेशाचा विचार केला तर मुंबई विमानतळानंतर गोवाचा क्रमांक लागतो. दाबोळी विमानतळापेक्षा अहमदाबाद विमानतळ अधिक मोठा आहे. परंतु, तेथे जरी विमानांची संख्या अधिक असली तर त्या विमानांतून कमी प्रवाशी येतात, असे मलिक म्हणाले. 

रिलिफ फ्‍लाईट अंतर्गत 117 विमानांची उड्डाणे
टाळेबंदीनंतर गोव्यात अडकलेल्या विदेशी प्रवाशांना त्यांच्या देशांमध्ये पाठविण्यासाठी रिलिफ फ्लाईट अंतर्गत 117 विमानांनी दाबोळी विमानतळावरून उड्डाणे केली होती. सुमारे 18 हजार 877 प्रौढ, तर 286 बालक प्रवाशांना त्यांच्या देशांत पाठविण्यात आले. त्यामध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली, ब्रिटन, रशिया, स्वित्‍झर्लंड, मंगोलिया, इस्त्रायल, कतार व इतर देशांचा समावेश आहे.

टाळेबंदीच्‍या काळात जे भारतीय विदेशात अडकले होते. त्यांना गोव्यात आणण्यात आले. त्यासाठी विमानांनी 86 उड्डाणे केली. 13 हजार 409 प्रौढ, तर 1120 बालकांना विदेशांतून गोव्यात आणले गेले. त्यानंतर केंद्र सरकारने सुरु केलेल्या वंदे भारत अंतर्गत 62 विमानांनी 9266 प्रौढ व 99 बालकांना गोव्यात आणले गेले, अशी माहिती त्यांनी दिली. 

टाळेबंदीच्‍या काळानंतर ब्रिटनला जाणारी विमानसेवा बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. विमानांचे उड्डाण करण्यासाठी स्लॉटस् मंजूर करण्यात आला आहे. केद्र सरकारकडून लवकरच मान्यता मिळेल, अशी खात्री आहे. ब्रिटनची आंतरराष्ट्रीय उड्डाणे ही रात्री न होता दिवसा होतील. दिवसा देशांतर्गत विमानांची उड्डाणे होत असल्याने आमच्यावर मोठा ताण असेल. परंतु, यातून योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले. एअर बबल अंतर्गत रशिया व ब्रिटन या देशांनी उड्डाणासंबंधी विनंती केली होती. रशियासाठी उड्डाणे लवकरच सुरू होणार आहेत, असे मलिक यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com