मांगोरहिलमध्‍ये सहनशीलतेचा बांध फुटला

Dainik Gomantak
सोमवार, 29 जून 2020

मांगोरहिल झोपडपट्टीत एका कुटुंबातील पाचजणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर राज्य प्रशासनाने कंटेन्‍मेंट झोन घोषित करून लोकांना घरातच बंदिस्त केले. या घटनेला एक महिना झाला. शासनाकडून लोकांना कोणत्याच सोयीसुविधा मिळत नसल्याने अखेर रविवारी (ता. २८) या झोनमधील शेकडो लोक रस्त्यावर उतरून त्यांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी लोकवस्तीतील बॅरिकेड्स भिरकावण्‍याचेही प्रकार घडले. एकंदर कंटेन्‍मेंट झोनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मुरगाव :

‘ना काम, ना कमाई, ना शासनाची मदत’, असे किती दिवस बंदिस्त होऊन काढावे लागणार, असा प्रश्र्न करून मांगोरहिल कंटेन्मेंट झोनमधील रहिवाशांनी रविवारी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात आवाज उठवला व निषेध नोंदवला. संयम सुटलेल्‍या काहीजणांनी लोकवस्तीत घातलेले बॅरिकेड्स भिरकावून टाकले. जिवंत राहिलो, तर प्रसंगी भीक मागून खावू, अशा परखड प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्‍या. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली.

मांगोरहिल झोपडपट्टीत एका कुटुंबातील पाचजणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर राज्य प्रशासनाने कंटेन्‍मेंट झोन घोषित करून लोकांना घरातच बंदिस्त केले. या घटनेला एक महिना झाला. शासनाकडून लोकांना कोणत्याच सोयीसुविधा मिळत नसल्याने अखेर रविवारी (ता. २८) या झोनमधील शेकडो लोक रस्त्यावर उतरून त्यांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी लोकवस्तीतील बॅरिकेड्स भिरकावण्‍याचेही प्रकार घडले. एकंदर कंटेन्‍मेंट झोनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

का भडकले मांगोरहिलवासीय
मांगोरहिल झोपडपट्टी परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर सुरवातीचे तीन दिवस रहिवाशांची स्वॅब तपासणी केली. त्यानंतर ही तपासणी बंद करण्यात आली. रहिवाश्यांना सोयीसुविधा पुरविण्याकडेही शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे लोकांनी आवाज उठविला. त्यानंतर आरोग्य तपासणी आणि सरकारची मदत सुरू झाली. पण, तीही अपुरी ठरू लागल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तब्‍बल महिनाभर लोकांनी सर्वकाही सहन केले. पण, रविवारी लोक संतप्‍त झाले आणि शेकडो लोक त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. सर्वजण एकाचवेळी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात दंड थोपटून उभे राहिले.

‘आता पुरे करा, तुमचे नाटक’
 ‘आता पुरे करा, तुमचे नाटक’ अशी धमकी देऊनच मांगोरहिल येथील कंटेन्‍मेंट झोनमधील लोक रस्त्यावर उतरून त्यांनी लोकवस्तीत घातलेल्या बॅरिकेड्ससुद्धा भिरकावून लावले. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात केलेले पोलिसही लोकांचा रुद्रावतार पाहत गप्प बसले.
कंटेन्‍मेंट झोनमधील लोक गेल्या महिनाभरापासून सरकारला सहकार्य करीत आहेत. या झोनमधील बहुतेक लोक दैनंदिन रोजगार करून कमाई करणारे आहेत. त्यांची मिळकत बंद झाल्याने संयम सुटला. लोकांची सहनशीलता संपली आणि त्याचा उद्रेक रविवारी झाला. आम्हाला मुक्त करा हीच मागणी लोकांची होती.

सहा किलो तांदूळ,
तीन किलो डाळ
कंटेन्‍मेंट झोनमधील लोकांना प्रशासनाची मदत मिळत नाही. गेल्या २८ दिवसांत सहा किलो तांदूळ आणि तीन किलो डाळ शासनाने दिली. त्‍याव्‍यतिरिक्त अन्य काहीच दिले नाही. लोकांची उपासमार वाढली आहे. रोजंदारीवर काम करणारे लोक अस्‍वस्‍थ झाले. कोरोनामुक्त असलेल्या लोकांना तरी मुक्त करा, अशी मागणी करून लोक घराबाहेर पडले आणि सरकाराविरोधात दंड थोपटले. याप्रसंगी बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या पोलिसांनी लोकांना समजवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

नगरसेवक पाश्कोल डिसोझा आणि सैफुल्ला खान यांनीसुद्धा याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. तांदूळ आणि डाळ दिली म्हणून जेवण होत नाही, तर त्याबरोबर मसाला, मीठ, तेल यासह अन्‍य वस्तूंही लोकांना पुरवाव्यात अशी सूचना नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांनी केली आहे. पण या सूचनांकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही.
आमदार कार्लुस आल्मेदा यांनी बडा मांगोर येथील लोकांना कंटेनमेंट झोनमधून मुक्त करावे अशी मागणी सरकारकडे केली. पण, त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. एकप्रकारे कंटेन्मेंट झोनमधील लोकांना वेठीस धरले जात असल्‍याचा समज तेथील रहिवाशांना झाल्यानेच त्यांनी रविवारी आपला संताप व्‍यक्‍त केला.

संबंधित बातम्या