हणजूण येथे घराला आग लागून नुकसान

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

मझलवाडा-हणजुण येथील लक्ष्मी नारायण आराबेकर यांच्या राहत्या घराला बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत अंदाजे 90 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती म्हापसा अग्निशमन दलाकडून मिळाली.

 शिवोली: मझलवाडा-हणजुण येथील लक्ष्मी नारायण आराबेकर यांच्या राहत्या घराला बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत अंदाजे 90 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती म्हापसा अग्निशमन दलाकडून मिळाली. दरम्यान, ही आग घातपातामुळे लागल्याचा संशय श्रीमती आराबेकर यांच्या निकटवर्तीयांनी स्थानिक प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. 

दरम्यान, रोजच्या प्रमाणे लक्ष्मी आराबेकर या जवळच्या पोस्ट ऑफीसात झाडलोट करण्यासाठी गेल्या असतां दुपारच्या सुमारास जवळच्या परिसरात नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या कामात दंग असलेल्या तरुणांनी आराबेकर यांच्या घराच्या मागील बाजूने आग भडकल्याचे पाहिले, आणी धांव घेत नळाचे पाईप जोडून घराची आग विझविण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.

दरम्यान, या आगीची माहिती म्हापसा अग्निशमन दलाला देण्यात आल्याने तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली व घरातील दोन भरलेले गेस सिलींडर तसेच अन्य सामान सुरक्षित स्थळी पोहोचवले.  दरम्यान, या आगीत आराबेकर कुटुंबीयांचे लाखभर रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दलाच्या सुत्रांनी दिली. दरम्यान, हणजुण कायसुवचे पंच सदस्य हनुमंत गोवेकर यांनी मझलवाड्यातील आराबेकर यांच्या घराची पाहाणी केली व स्थानिक पंचायत फंडातून शक्य ती आर्थिक मदत मिळवून देण्याचे  आश्वासन दिल्याचे लक्ष्मी आराबेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या