खोर्ली येथे गोदामाला आग लागून नुकसान

प्रतिनिधी
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

७ ते ८ लाखांची हानी झाल्याचा अग्निशामक दलाचा दावा

म्हापसा: सीम खोर्ली म्हापसा येथे एका अपूर्णावस्थेतील इमारतीच्या गोदामाला रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत इमारतीचे मालक हजरत अली शेख यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या आगीत सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले, तर ४० लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आल्याचा दावा म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी केला आहे.

या आगीसंदर्भात रविवारी सायंकाळी ७.४३ च्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांचा फोन आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे लीडिंग फायटर प्रमोद महाले, चालक नितीन चोडणकर, फायर फायटर रिचर्ड त्रिनिनाद, नितीन मयेकर यांनी तिथे धाव घेऊन सुमारे सव्वा दोन तास त्या आगीशी झुंज देत ती पूर्णत: विझवण्यात यश मिळवले.

या सुमारे तीन मजली इमारच्या तळमजल्याला पोटमाळा आहे. तळमजल्यावर तसेच त्याच मजल्याच्या पोटमाळ्यावर स्वच्छतागृहासाठी लागणारे सेनिटरी साहित्य साठवून ठेवले होते. त्यामध्ये इंग्लिश व युरोपियन टॉयलेट आणि तत्सम साहित्याचा समावेश होता. सुमारे शंभर चौरस मीटर क्षेत्रफळाच्या त्या तळमजल्यावर असलेल्या बॉक्सना आग लागली व ती सर्वत्र फैलावली. आगीमुळे तेथील साहित्याचे नुकसान झाले.

या इमारतीच्या बाजूला कुणीतरी गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त फटाके पटवले असावेत व त्यामुळे ही आग गोदामाला लागली असावी, असा कयास दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे. इमारतीच्या पहिल्या तसेच दुसऱ्या मजल्यावर ती आग पोहोचू शकली नाही, असेही दलाच्या जवानांनी स्पष्ट केले.

 

संबंधित बातम्या