मुरगाव नगरपालिकेच्या 53 व्या नगराध्यक्षपदी दामोदर कासकर

मुरगाव नगरपालिकेच्या 53 व्या नगराध्यक्षपदी दामोदर कासकर
Margao Municipality

दाबोळी: मुरगाव नगरपालिकेच्या 53 व्या नगराध्यक्षपदी दामोदर कासकर यांची, तर 48 व्या उपनगराध्यक्षपदी श्रद्धा महाले शेट्ये यांची निवड झाली आहे. काल शपथविधी सोहळा निर्वाचन अधिकारी राजेंद्र गावस, तसेच मुख्याधिकारी जयंत तारी यांच्या उपस्थितीत पार पडला.(Damodar Kashikar as the 53rd Mayor of Margao Municipality)

मुरगाव तालुक्यातील आमदार, भाजप पुरस्कृत पॅनलचे 19 नगरसेवक व दोन अपक्ष यांच्या सहमतीने दामोदर कासकर व श्रद्धा महाले शेट्ये यांची नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. बुधवारी मुरगाव नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करताना राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर खास उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत दामोदर कासकर व श्रद्धा महाले शेट्ये यांनी आपले अर्ज मुख्याधिकारी जयंत तारी यांच्याकडे सुपूर्द केले होते. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणी अर्ज सादर न केल्याने त्यांची या पदासाठी निवड निश्चित झाली होती. गुरुवारी फक्त औपचारिकता तेवढी बाकी होती, ती पूर्ण करण्यात आली.

काल सकाळी पालिका इमारतीतील जनता वाचनालय सभागृहात औपचारिकता म्हणून नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षपदासाठी शपथ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळ्याला सुरवात झाली. या शपथविधी सोहळ्याला निर्वाचन अधिकारी म्हणून राजेंद्र गावस उपस्थित होते. तसेच मुख्याधिकारी जयंत तारी उपस्थित होते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुरगाव पालिकेच्या 25 ही प्रभागाच्या नवनिर्वाचित निवडून आलेल्या नगरसेवकांचा शपथविधी सोहळा पार पडला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com