गालजीबाग, राजबाग-तारीर, आगोंद किनाऱ्यांना धोका

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

गालजीबाग, राजबाग-तारीर, आगोंद किनाऱ्यांना धोका त्वरित उपाययोजनेची गरज

काणकोण: गालजीबाग,राजबाग-तारीर व आगोंद किनाऱ्याची  प्रचंड धूप, झाली आहे.ती थांबवण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भविष्य काळात समुद्र मनुष्य वस्तीत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या  संदर्भात श्री मल्लिकार्जुन चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एफ.एम.नदाफ यांनी तीन्ही किनाऱ्यांचा अभ्यास दौरा केला आहे. ते महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रमूख आहेत. एकमेव राजबाग- तारीर  किनाऱ्याच्या ४०० मीटर लांबीच्या किनाऱ्याची २५ ते ३५ मीटर रूंदीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. हे प्रमाण कमी अधिक प्रमाणात अन्य किनाऱ्यावर आहे.काणकोणात एकूण १३ किनारे असून त्यापैकी  साठ टक्के किनारे दगडांनी व्यापले आहेत. जागतीक स्तरावर ज्यांची ख्याती आहे ते गालजीबाग,पाळोळे,आगोंद व राजबाग या किनाऱ्याना वादळी लाटाचा धोका जास्त आहे. ऑगस्ट यहिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने लाटाची उंची वाढल्याने किनाऱ्याची झीज होऊन काही झाडे उन्मळून पडली आहेत.  किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी लावलेली सुरूची झाडे मोठ्या लाटाच्या तडाख्यामुळे उन्मळून पडली आहेत. भविष्य काळासाठी ही धोक्याची सूचना आहे.यावर त्वरीत उपाय योजना करण्याची गरज आहे अन्यथा किनाऱ्यालगतच्या रहिवाशांना मोठा धोका संभवू शकतो असे मत डॉ.एफ.एम.नदाफ यांनी दै.गोमन्तकशी बोलताना व्यक्त केले. मात्र प्रचंड लाटांचा मारा परतवून लावण्यासाठी सिमेंट कॉक्रिटच्या भिंती उभारणे जास्त धोकादायक ठरणार आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाटांमुळे होणारी झीज रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात किनाऱ्यावर सुरुच्या झाडाची लागवड करणे,किनाऱ्यावरील वाळूच्या टेकड्याचे संवर्धन करणे,किनाऱ्यावरील वेलीचे संवर्धन करणे यासारखे उपक्रम प्रधान्य क्रमाने हाती घेणे गरजेचे आहे.किनाऱ्याची प्रचंड धूप होण्यास निसर्गाबरोबरच मानवी हस्तक्षेपही कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.

गालजीबाग व अन्य किनाऱ्यावर वन खात्याने किनाऱ्याची धूप व झीज रोखण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी किनाऱ्यावर सुरुच्या झाडाची लागवड करून वृक्षाचे आच्छादन तयार केले होते मात्र त्यानंतर वन खात्याने त्या वृक्षाच्या संवर्धनासाठी कोणतीच उपाययोजना केली नाही किंवा नवीन झाडाची लागवड केली नाही.झरवृक्षी पावसाळ्यात अनेक झाडे किनाऱ्यावर उन्मळून पडत आहेत त्याकडेही वन खाते लक्ष देत नसल्याचे स्थानीकाचे मत आहे.
 

संबंधित बातम्या