भात पिकासाठी धोकादायक 'सुरळीतील अळी’

तेजश्री कुंभार
रविवार, 9 ऑगस्ट 2020

राज्यावर कोविडचे संकट तर आहेच. मात्र गेल्या आठवाड्यभरापासून निसर्गही अनेक वेगवेगळी संकटे शेतकऱ्यासमोर आणून ठेवत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

 

पणजी, ता. ८ ः राज्यावर कोविडचे संकट तर आहेच. मात्र गेल्या आठवाड्यभरापासून निसर्गही अनेक वेगवेगळी संकटे शेतकऱ्यासमोर आणून ठेवत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यासमोर एक नवीन संकट येऊन ठेपले असून पिकावर आता सुरळीची अळी म्हणजेच `निम्फ्युला डिपक्नट्यालीस’ नावाची कीड पडत आहे. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. ही कीड प्रामुख्याने दक्षिण गोव्यातील भात शेतीचे अधिक नुकसान करीत असल्याची माहिती डॉन बॉस्को शेतकी महाविद्यालयाचे कीटकशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक राजन शेळके यांनी दिली.
कीड प्रामुख्याने अधिक पाऊस झाल्यांनतर भात पिकावर पडते. दमट वातावरण असणाऱ्या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक झाले, की या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. कीड प्रामुख्याने पानातील हरितद्रव्ये खाते. त्यामुळे पानांवर पांढरे पट्टे दिसतात. तसेच शेंड्याकडील भाग कुरतडून त्यापासून सुरळी बनवली जाते आणि कीड सुरळीमध्ये कोषावस्थेत जाते. म्हणूनच या किडीचा प्रादुर्भाव झाला, शेतामध्ये सुरळ्या लटकलेल्या दिसतात. या सुरळ्या पाण्यावर तरंगत असल्याचे निरीक्षण प्रा. शेळके यांनी नोंदविले.
पिकांवर पडलेली ही कीड कशी ओळखायची याबद्दल सांगताना ते म्हणाले, प्रौढ असणारी कीड पांढऱ्या रंगाची असते आणि त्यावर तपकिरी रेषा असतात तसेच काळे ठिपकेही दिसतात. अळी मात्र हिरव्या रंगाची असते आणि अळीचे डोके केशरी रंगाचे असते. प्रौढ मादी पिकाच्या पानावर अंडी घालते. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत होण्याची शक्यता असल्याचे प्रा. शेळके यांनी सांगितले.

असे करा किडीचे नियंत्रण
पाण्यातील भुंगा, चतुर यांचे संवर्धनही कीड संपविण्यास मदत करणारे असते. शेतात किडीमुळे निर्माण होणाऱ्या सुरळी एकत्रित वेचणे आणि त्यांना नष्ट करणे. दोरीच्या साहाय्याने फुटव्याना लटकणाऱ्या सुरळ्या पाण्यात पडून नंतर शेतीतील पाणी बाहेर काढणे. पाण्यात प्रति एकरी २५० मिली केरोसिन मिसळले तरी या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत असल्याचे प्रा. शेळके म्हणाले. या किडीला संपविण्यासाठी क्लोरोपायरीफॉस २५ ईसी किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी या कीटकनाशकांचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

EDITING _ SANJAY GHUGRETKAR

GOA GOA 

संबंधित बातम्या