चोर्ला घाटात दरड कोसळी

दशरथ मोरजकर
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

गेल्या दोन तीन दिवसांपासून चोर्ला घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम आज चोर्ला घाट मार्गातील दरडी कोसळण्यावर झाला आहे.

पर्ये, 

गेल्या दोन तीन दिवसांपासून चोर्ला घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम आज चोर्ला घाट मार्गातील दरडी कोसळण्यावर झाला आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास घाटातील कर्नाटक सीमा भागातील एकाच ठिकाणी तीन दरडी कोसळल्याने घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूने वाहनांची कोंडी झाली. त्यानंतर वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे दरड हटाव पथक घटनास्थळी दाखल होऊन दरडी हटविण्याचे काम सुरू केले. दरडी हटवण्यासाठी दोन जेसीबी यंत्राच्या मदतीने सुमारे सहा तास काम करून तिन्ही दरडी हटविल्या व रस्ता वाहतुकीस खुला केला. दुपारी ३ च्या दरम्यान रस्ता वाहतुकीस खुला झाला.
आजचे हे दरडी हटविण्याच्या कामाचे निरीक्षण वाळपई मामलेदार इशांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलींगकर, वाळपई पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर, अग्निशमन दलाचे निरीक्षक संतोष गावस, सा. बा. खात्याचे कनिष्ठ अभियंता झिलबाराव देसाई आदी उपस्थित होते.
यापावसाचा फटका चोर्ला घाट मार्गाच्या झाडांना बसला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाले उन्मळून रस्त्यावर पडली आहे त्यामुळे रस्त्याला अडथळा निर्माण झाला. दरम्यान वाळपई अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावर पडलेल्या झाडे हटवली.

संपादक - संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या