सांगे परिसरात अंधार

Manoday Phadte
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

गेल्या चार पाच दिवसांपासून सांगे भागात पडत असलेल्या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात मोडतोड केली नसली, तरी वीज खात्याची धावपळ करून सर्वसामान्य नागरिकांची झोपमोड केली आहे.

सांगे

वीज कार्यालयात खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करू गेल्यास एक तर कंट्रोल रूममध्ये कोणीच नसतो आणि असल्यास कर्मचारी नाही ते लाईनवर दुरुस्तीसाठी गेले आहेत. अशीच उत्तरे खास करून रात्रीच्या वेळी दिली जात असल्याने खंडित झालेली वीज रात्रभर गायब झालेली असते. तक्रार दिल्यास ती दुरुस्त करण्यासाठी तीस तासपेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
वादळी वाऱ्याने बऱ्याच ठिकाणी वीज खात्याला तोंड द्यावे लागले आहे. काही प्रमाणात जनतेचा रोष पत्करून घ्यावा लागत आहे. रात्री अपरात्री दोन कामगार खंडित वीज शोधण्यासाठी मोबाईल टॉर्च घेऊन फिरत असतात. विजेरी नाही, पायात गमबूट नाही, वादळी वाऱ्याने शॉर्टसर्किट शोधण्यासाठी दोन कामगार फिरतात, त्यांना अंधारात इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज वाहिन्या तुटून पडलेल्या असल्यास मोबाईल विजेरीत दृष्टीस पडणे शक्य नाही. अशी जोखीम पत्करून काम करणाऱ्यांना सुरक्षा देणे गरजेचे बनले आहे.
दिवस रात्र काम करणाऱ्या लाईनमन, लाईन हेल्पर, अपुरा कामगारांमुळे वीज अधिकाऱ्यांना दिवसा आणि रात्री विभागणी करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना नकोसे होत आहे. कित्येक कर्मचारी सेवा निवृत्त झाले, त्या जागी नवीन कामगार भरती करण्यात आलेली नाही. शहर वगळता अन्य कुठेच कंट्रोल रूम नाही आणि गेलेल्या विजेचा शोध घेण्यासाठी कोणीच जाग्यावर नसतो.
सांगे पालिका क्षेत्र आणी उगे पंचायत क्षेत्रातील गेलेली वीज दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंट्रोल रूममधील दोन कर्मचाऱ्यांवर असते. एका ठिकाणी गेलेली वीज दुरुस्ती करून येईपर्यंत तासंतास प्रतीक्षा करावी लागत असते.
वादळी वाऱ्याने वीज वाहिन्यांत बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्यासाठी वीज खात्यात मनुष्यबळ नाही. शेकडो तक्रारी दोन कर्मचारी कसे काय तोंड देतील याचा विचार वीजमंत्र्यांनी करायला हवा. वीज बिलात वाढ केली तरीही जनता बिल फेड करीत असतात. त्या मानाने जनतेला चांगली सेवा देण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या